जालना : ब्लू सफायर फूड प्रोसेसिंग हा गूळ पावडर कारखाना उसाचे गाळप करण्यासाठी सज्ज आहे. येत्या ऑक्टोबरपासून कारखान्याचा गळीत हंगाम सुरू होईल. हंगामात सुमारे तीन लाख टन ऊस गाळप करण्याचे कारखान्याचे उद्दिष्ट आहे. परिसरातील इतर कारखान्यांच्या बरोबरीने दर दिला जाईल, असे कारखान्याचे संस्थापक, शिवसेना नेते डॉ. हिकमत उढाण यांनी जाहीर केले. कारखान्याच्या पहिल्या अग्निप्रदीपन कार्यक्रमात ते बोलत होते.
कंडारी अंबड येथे नव्याने उभारलेल्या ब्लू सफायर फूड प्रोसेसिंग या गूळ पावडर कारखान्याचा अग्निप्रदीपन समारंभ मंगळवारी डॉ. हिकमत उढाण आणि डॉ. मायाताई उढाण यांच्या हस्ते पार पडला. यावेळी लवकरच कारखान्याच्या गाळप क्षमतेत वार्षिक वाढ केली जाणार असल्याचे डॉ. हिकमत उढाण यांनी सांगितले. डॉ. हिकमत उढाण म्हणाले की, या कारखान्यामुळे परिसरातील उद्योग-व्यवसायाला गती येणार आहे. शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती होईल. युवकांना नोकरीच्या संधी मिळतील. आम्ही या एकाच कारखान्यावर थांबणार नाही. काही दिवसातच प्रस्तावित दुसऱ्या कारखान्याच्या कामाला सुरुवात केली जाईल. यावेळी कारखान्याचे महाव्यवस्थापक संजय तुरे-पाटील, जयंत कुलकर्णी, मारुती सातगीरे, मुख्य शेती अधिकारी विलास डाके, डॉ. राजन उढाण, नीळकंठ उढाण यांच्यासह शेतकरी, पदाधिकारी आदी उपस्थिती होते.