सातारा : कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांना येत्या १ ऑक्टोबरपासून पगारवाढ देण्यात येत असल्याची घोषणा कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांनी केली. कारखान्याच्या ६४ व्या बॉयलर अग्नी प्रदीपन सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी अध्यक्ष भोसले यांनी कामगारांना दिवाळीनिमित्त दोन पगार बोनस देणार असल्याचेही जाहीर केले. रेठरे बुद्रुक (ता. कऱ्हाड) येथे कृष्णा सहकारी साखर कारखान्यात अध्यक्ष डॉ. भोसले व त्यांच्या पत्नी उत्तरा भोसले यांच्या हस्ते बॉयलर अग्नी प्रदीपन करण्यात आले. यावेळी मच्छिंद्र गडावरून आणलेल्या ज्योतीचे पूजन करण्यात आले.
डॉ. भोसले म्हणाले, या गळीत हंगामात कारखाना लवकर सुरू करण्याचा आमचा मानस आहे. कारखान्यात मोठ्या प्रमाणात आधुनिकीकरण केले जात आहे. कारखान्याची यंत्रसामुग्री जुनी झाली असल्याने ती टप्प्याटप्प्याने बदलली जात आहे. यावेळी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक शिवरुपराजे खर्डेकर, कृष्णा सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले, विनायक भोसले, कारखान्याचे उपाध्यक्ष जगदीश जगताप, संचालक, एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर सी. एन. देशपांडे, कार्यकारी संचालक राम पाटील, मनोज पाटील, वैभव जाखले आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. उपाध्यक्ष जगदीश जगताप यांचे भाषण झाले. कार्यकारी संचालक राम पाटील यांनी स्वागत केले. जितेंद्र पाटील यांनी आभार मानले.