सांगली : क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाग सहकारी साखर कारखान्याने नेहमीच शाश्वत विकासावर भर दिला आहे. या परिसरात सर्वात चांगल्या दर्जाच्या द्राक्षाचे उत्पादन होऊ शकते. फक्त निर्यातक्षम द्राक्षांसाठी रेसिड्युशिवाय न बनवता भारतीय बाजारपेठेसाठीही तशी द्राक्षे निर्माण करावीत, असे प्रतिपादन द्राक्षतज्ज्ञ अमित पडोळ यांनी केले. निर्यातक्षम द्राक्ष रेसिड्यू मॅनेजमेंट व नवीन जाती या विषयावरील चर्चासत्रात ते बोलत होते. साखर कारखान्यावर द्राक्ष पिक उत्पादन वाढीचे चर्चासत्र हा दुर्मिळ योग आहे, असे ते म्हणाले.
साखर कारखान्यातर्फे आयोजित द्राक्ष पीक चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी आमदार अरुणअण्णा लाड होते. यावेळी द्राक्ष बागायतदार संघाचे अध्यक्ष सुभाष आर्वे, मारुती चव्हाण, एन. डी. पाटील -पिलीवकर यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. पडोळ म्हणाले, सद्यस्थितीत निर्यातक्षम द्राक्षांना चांगले भवितव्य आहे. या भागातील वातावरण पोषक आहे. त्यामुळे त्याची निर्यात केल्यास चांगला फायदा होऊ शकेल. आमदार लाड म्हणाले की, निर्यातक्षम द्राक्ष उत्पादनाबरोबर नवीन तंत्रज्ञान, नवीन जाती व्यवस्थापन आदींवर चर्चासत्रांचे आयोजन केले जाणार आहे. ऊस शेतीच्या पलीकडे जाऊन शेतीची सेवा करा असा मंत्र जी. डी. बापूंनी दिला. त्याची जपणूक करताना साखर कारखान्याच्यावतीने द्राक्ष पिकाचे संवर्धन करण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले.