वारणा कारखान्याकडून मार्चमधील उसासाठी प्रतीटन २०० ते ३०० रुपये जादा दराची घोषणा

वारणानगर : तात्यासाहेब कोरे वारणा साखर सहकारी कारखान्याला मार्च महिन्यात ऊस पुरवठादार शेतकऱ्यांना प्रतिटन २०० ते ३०० रुपये जादा दर देण्याची घोषणा अध्यक्ष आमदार डॉ. विनय कोरे यांनी साखर कारखान्याच्या ६७ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना केली. कारखान्याने मोठ्या प्रमाणात कर्जाची परतफेड केली असल्याची माहितीही अध्यक्ष कोरे यांनी यावेळी दिली.

मार्च महिन्यात ५० टनांपेक्षा अधिक ऊस घालणाऱ्या शेतकऱ्यांना लकी ड्रॉद्वारे तीन बुलेट मोटारसायकली तर ३० टन ऊस देणाऱ्या गटनिहाय पाच भाग्यवंतांना साखर कारखाना परदेश वारी घडवणार आहे. सलग तीन वर्षे ४० टन ऊस पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांना सभासदत्व, तर कायम ऊसपुरवठा करणाऱ्या गावांचा कार्यक्षेत्रात समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती विनय कोरे यांनी सभेत दिली.

आ. विनय कोरे म्हणाले की, वारणा साखर कारखान्याने गेल्यावर्षी काटकसरीने गाळप केले. कारखान्याने आतापर्यंत  ६० कोटी रुपये कर्जाची परतफेड केली आहे. यावर्षी सुमारे १५० कोटी रुपये कर्जाची परतफेड केली जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सभासदांनी सर्व विषय मंजूर केले. यावेळी ऊसभूषण पुरस्कार प्राप्त पाडळी येथील शेतकरी राजाराम जाधव यांच्यासह शेतकऱ्यांचा तसेच वाहनधारकांचा सत्कार करण्यात आला. कारखान्याचे कार्यकारी संचालक एस. आर. भगत यांनी विषय वाचन केले. उपाध्यक्ष प्रतापराव पाटील यांनी आभार मानले. दूध संघाचे उपाध्यक्ष एच. आर. जाधव, ऊर्जाकूर प्रकल्पाचे अध्यक्ष रावसाहेब पाटील, नवशक्ती संस्थेचे अध्यक्ष एन. एच. पाटील, राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष डॉ. प्रताप पाटील, कार्यकारी संचालक शहाजी भगत आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here