कसबा बावडा : छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्राचा विस्तार करण्याचा ठराव कारखान्याच्या वार्षिक सभेत मंजूर करण्यात आला. या निर्णयाने कार्यक्षेत्रात ५५ नवी गावे जोडली जाणार आहेत. कारखान्याचे चेअरमन, माजी आमदार अमल महाडिकयांनी सभेत आगामी १८ महिन्यांत सहवीज निर्मिती प्रकल्प उभारणीचा निर्णय जाहीर केला. ज्येष्ठ संचालक माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या अध्यक्षतेखाली वार्षिक सभा झाली. सभेत सर्व विषय मंजूर करण्यात आले.
चेअरमन महाडिक म्हणाले की, शहरामध्ये कारखाना असल्यामुळे कार्यक्षेत्रातील अनेक गावांमध्ये नागरीकरण वाढले आहे. कार्यक्षेत्रातील अनेक गावांमधून हायवेचे काम सुरू असल्याने मोठ्या प्रमाणात क्षेत्र कमी झाले. यामुळे ऊस क्षेत्र वाढीसाठी सभासदांच्या मागणीनुसार ठराव केला आहे. कार्यक्षेत्रात सांगली जिल्ह्यातील काही गावांचा समावेश होईल. कारखान्याच्या नऊ हजार सभासदांचा ऊस गळितासाठी येतो. तो वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
सभेत पीक विमा योजनेमध्ये उसाचा समावेश करावा, कारखान्यांनी घेतलेल्या कर्जाचे हप्ते परतफेडीस किमान दोन वर्षांची मुदतवाढ द्यावी, इथेनॉल प्रकल्प उभारणीसाठी दीर्घ मुदतीचे बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून द्यावे. सहवीजनिर्मिती प्रकल्पातील विजेचा खरेदी दर किमान ६ रुपये प्रतियुनिट करावा, साखरेचा किमान विक्री दर ३,६०० रुपये प्रती क्विंटल करावा, आदी मागण्या करण्यात आल्या. कार्यकारी संचालक प्रकाश चिटणीस यांनी विषय वाचन केले. त्यांनी सभासदांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. व्हा. चेअरमन नारायण चव्हाण, संचालक दिलीप पाटील, दिलीप उलपे, तानाजी पाटील, डॉ. एम. बी. किडगावकर, सर्जेराव पाटील बोने, माजी नगरसेवक सत्यजित कदम, सचिव उदय मोरे यांच्यासह सर्व संचालक उपस्थित होते. माजी चेअरमन शिवाजी पाटील यांनी आभार मानले.
सभेसाठी सत्तारूढ आणि विरोधक दोन्ही गटांच्या समर्थकांनी गर्दी केली होती. यामुळे मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. समर्थकांच्या घोषणांनी सभास्थळ दणाणले. सत्तारुढ आघाडीने सभा गुंडाळली असा आरोप करत विरोधकांनी समांतर सभा घेतली.