मुंबई : आरबीआयने आता २००० रुपयांच्या नोटा बदलण्याची मुदत ७ ऑक्टोबरपर्यंत वाढवली आहे. त्यामुळे आता लोकांना नोटा बदलून घेण्यासाठी एका आठवड्याचा अतिरिक्त वेळ मिळाला आहे. रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयामुळे लोकांना मोठा दिलासा दिला आहे. रिझर्व्ह बँकेने ३० सप्टेंबरपर्यंत नोट जमा करण्यासाठी वेळ दिला होता. अनिवासी भारतीयांना २००० रुपयांच्या नोटा बदलण्यासाठी अतिरिक्त वेळ देण्याची मागणी करण्यात आली होती.
भारतीय रिझर्व्ह बँकेने ३० सप्टेंबर रोजी जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, नोटा बदलून घेण्यासाठी एका आठवड्याचा अतिरिक्त वेळ देण्याचा निर्णय घेतला आहे. आरबीआयने यंदा १९ मे रोजी एक परिपत्रक जारी करून ३० सप्टेंबरपर्यंत २००० रुपयांच्या नोटा बँकांमध्ये जमा करण्यास किंवा बदलण्यास सांगितले होते. यानंतरही २००० रुपयांची नोट कायदेशीर राहतील, असे त्यावेळी सांगण्यात आले होते.