सांगली : यंदाच्या नव्या गळीत हंगाम २०२३- २४ मध्ये उसाला प्रती टन ५,००० रुपये द्या अथवा दोन साखर कारखान्यांमधील अंतराची अट रद्द करा अशी मागणी शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी केली. शेतकऱ्यांना मागील वर्षाच्या उसाचे प्रती टन १ हजार रुपये द्यावेत, अशी आग्रही मागणीही पाटील यांनी यावेळी केली. साखराळे येथे शुक्रवारी पाटील यांच्या निवासस्थानी बैठक झाली.
साखर कारखान्यांनी मागील गळीत हंगामापोटी सर्व शेतकऱ्यांना १,००० रुपये प्रती टन द्यावेत आणि चालू होणाऱ्या गळीत हंगामात ५,००० रुपये दर मिळावा, अशी मागणी बैठकीला उपस्थित पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी केली. जर अपेक्षित दर दिला नाही तर दोन साखर कारखान्यांमधील अंतराची अट रद्द करावी, अशा मागणीचा ठराव करण्यात आला.
ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनेने येडेमच्छिंद्र येथे क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यास अभिवादन करून, कराड तालुक्यातील कारखाने, सांगली जिल्ह्यातील सर्व कारखान्यांच्या अध्यक्ष, प्रशासनाला भेटून निवेदन देण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी राज्य कार्यकारिणी सदस्य महादेव कोरे, जिल्हा उपाध्यक्ष शंकरराव मोहिते, नंदकुमार पाटील, शंकर हाके, राजू बिरनाळे, धनपाल माळी, वंदना माळी, परशुराम माळी, राजेंद्र माने, गणेश जुगदर, भाऊसाहेब पवार, आबासाहेब वावरे आदी उपस्थित होते.