सोलापूर : भीमा सहकारी साखर कारखान्याच्या ६८ कोटी रुपयांच्या ६० केएलपीडी इथेनॉल व डिस्टिलरी प्रकल्पाला केंद्र शासनाची मंजुरी मिळाली आहे, असे प्रतिपादन कारखान्याचे चेअरमन विश्वराज महाडिक यांनी केले. भीमा साखर कारखान्याची ४४ वी वार्षिक सर्व साधारण सभेत ते बोलत होते. यावेळी या प्रकल्पास सभासदांची मान्यता देण्यात आली.
टाकळी (सि) ता. मोहोळ येथे कारखाना कार्यस्थळावर ही वार्षिक सभा झाली. या सभेत भीमा सहकारी साखर कारखान्याचे नामांतरण कै. पैलवान भीमराव दादा महाडिक सहकारी साखर कारखाना असे करण्याचे एकमुखाने मंजूर करण्यात आले. चेअरमन विश्वराज महाडिक म्हणाले की, खासदार धनंजय महाडिक यांनी सोलापूर जिल्ह्याच्या विविध विकासकामांना चालना दिली आहे. कारखान्याच्या हितासाठी अनेक चांगले निर्णय घेतले गेले. त्यासाठी केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आदींच्या सहकार्याने कारखान्याचा विकास सुरू आहे.
ते म्हणाले, आम्ही कारखान्याचे विस्तारीकरण केले आहे. आगामी काळात साखर कारखान्याच्या हितासाठी कठोर निर्णयही घेतले जातील. संस्था पारदर्शकपणे चालावी यासाठी प्रयत्न आहेत. डिस्टिलरी प्रकल्पासाठीची सर्व तांत्रिक प्रक्रिया पूर्ण केली आहे. उपपदार्थ निर्मिती हे आगामी धेय्य आहे. शेतकरी ऊर्जादाता व्हावा यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या म्हणण्यानुसार प्रयत्न सुरू आहेत. सभेवेळी खासदार धनंजय महाडिक, व्हाईस चेअरमन सतीश जगताप, कार्यकारी संचालक शिंदे, शिवाजी गुंड -पाटील, तानाजी चव्हाण, रामदास चव्हाण, दिगंबर माळी, दत्तात्रेय सावंत, सज्जन पवार, महादेव देठे, छगन पवार, तुषार चव्हाण, सर्व संचालक मंडळ, सभासद-शेतकरी, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.