कोल्हापूर : ‘गोडसाखर’साठी वीस वर्षापूर्वी बँकांची दारे बंद झाली होती. मात्र तब्बल वीस वर्षांनी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या सहकार्यातून जिल्हा बँकेने कारखान्याला अर्थपुरवठा केला आहे. त्यातून कारखान्याला पुनरुज्जीवन मिळाले आहे. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून या वर्षीचा गळीत हंगाम सुरू करणार असल्याची घोषणा अध्यक्ष डॉ. प्रकाश शहापूरकर यांनी केली. आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखान्याची ५२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा कारखाना कार्यस्थळावर पार पडली. यावेळी डॉ. शहापूरकर बोलत होते.
अध्यक्ष डॉ. शहापूरकर म्हणाले, कारखाना सध्या आर्थिक अडचणीत आहे. ऑक्टोबरअखेर सर्व कामे पूर्ण करणार असून, प्रतिदिन गाळप क्षमता २५०० वरून ३८०० मे. टन करणार आहे. या हंगामात किमान साडेचार लाख मे. टन गाळपाचे उद्दिष्ट ठेवल्याचेही डॉ. शहापूरकर यांनी यावेळी सांगितले. उपाध्यक्ष प्रकाश चव्हाण यांनी स्वागत केले. कार्यकारी संचालक सुधीर पाटील यांनी विषय पत्रिकेचे वाचन केले. दरम्यान, याचवेळी ब्रिस्क कंपनीच्या विषयावरून गोंधळाला सुरुवात झाली. डॉ. शहापूरकर यांनी मागील वार्षिक सभेला सभासदांची मोठी अनुपस्थिती राहिल्याने त्या सभेचे सर्व विषय नामंजूर करत असल्याचे स्पष्ट केले. तर आजच्या सभेच्या विषयांना मंजुरी आहे का? अशी विचारणा करताच सभासदांमधून मंजूर.. मंजूर.. च्या घोषणा झाल्या अन् राष्ट्रगीत घेऊन सभा संपल्याचे जाहीर करण्यात आले.
सभासदांच्या वतीने संस्थापक अध्यक्ष आप्पासाहेब नलवडे, उपाध्यक्ष काकासाहेब शहापूरकर यांचे तैलचित्र कारखान्याला सुपूर्द करण्यात आले. सभेला संचालक सतीश पाटील, विद्याधर गुरंबे, प्रकाश पताडे, बाळासाहेब मंचेकर, अॅड. दिग्विजय कुराडे, शिवराज पाटील, अशोक मेंडूले, सोमनाथ पाटील व कर्मचारी, सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, कामगार नेते शिवाजी खोत यांनी त्याच ठिकाणी निवृत्त कामगार सभासदांची समांतर सभा घेतली. यावेळी त्यांनी या सभेबाबत साखर आयुक्तांकडे तक्रार दाखल करणार असल्याचे स्पष्ट केले.