पुणे : राज्यात यंदाच्या, २०२३-२४ या गळीत हंगामासाठी तब्बल २१७ साखर कारखान्यांनी साखर आयुक्तालयाकडे गाळप परवान्यासाठी प्रस्ताव दाखल केले आहेत. गेल्या काही वर्षात गळीत हंगामासाठी दाखल प्रस्तावांपैकी ही सर्वाधिक संख्या आहे. यंदाचा हंगाम एक नोव्हेंबरपासून सुरू होण्याची शक्यता आहे, असे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने (विस्मा) राज्य सरकारकडे १५ ऑक्टोबरपासून गळीत हंगाम सुरू करावा, अशी मागणी केली आहे.
गळीत हंगामासाठी दाखल झालेले प्रस्ताव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या मंत्री समितीच्या बैठकीसाठी साखर आयुक्तालयाने पाठवले आहेत. लवकरच बैठक निश्चिती होणार आहे. त्यामुळे यंदाचा ऊस गाळप हंगाम एक नोव्हेंबरपासून सुरू होण्याची शक्यता आहे. राज्यात यंदा १ हजार ७८ लाख टन गाळपासाठी उपलब्ध राहिल असे साखर आयुक्तालयाचे म्हणणे आहे. प्राथमिक अंदाजानुसार यापैकी ९० टक्के ऊस गाळपाला येईल. त्यामुळे साधारणतः ९७० लाख टन ऊस गाळप होईल, असा अंदाज आहे. कमी उसामुळे नोव्हेंबर ते जानेवारी असा तीन महिने गळीत हंगाम सुरू राहिल, अशी शक्यता आहे.