पुणे : शेतकऱ्यांच्या उसाचा खरा उतारा दाखवणारे केन सॅम्पलिंग मशीन बसवण्याची सक्ती राज्यातील सर्व साखर कारखान्यांना करावी, अशी मागणी आंदोलन अंकुश संघटनेने साखर आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्याकडे केली आहे. त्यातून साखर कारखान्यांकडून होणाऱ्या उसाच्या उतारा चोरीवर नियंत्रण राहील असे संघटनेचे म्हणणे आहे. सोमवारी आंदोलन अंकुशचे नेते धनाजी चुडमुंगे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने साखर आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांची भेट घेवून मागण्यांचे निवेदन दिले.
साखर आयुक्तांना भेटलेल्या शिष्टमंडळात ‘आंदोलन अंकुश’चे दीपक पाटील, दत्तात्रय जगदाळे, बाळासाहेब भोगावे व अमोल माने यांचा समावेश होता. याबाबत साखर आयुक्तांनी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचा अभिप्राय घेवून शिफारस करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. तर चुडमुंगे यांनी निवेदनात दिलेल्या माहितीनुसार, २०१८-१९ मध्ये कृषी मूल्य आयोगाने तशा सूचना सर्व साखर आयुक्तांना दिल्या आहेत. यंदाच्या गळीत हंगाात राज्यात अशा मशीनवर येणाऱ्या रिकव्हरीनुसार उसाचा दर शेतकऱ्यांना मिळावा, अशीही मागणी केली आहे.
केंद्र सरकार केन सॅम्पलिंग मशीनसाठी ७५ टक्के अनुदान देते. या मशीनची किंमत सुमारे दोन ते अडीच कोटी रुपये आहे. उर्वरीत पैसे शेतकऱ्यांकडून घ्यायचे आहेत. त्यामुळे याची अमलबजावणी तातडीने करावी अशी मागणी करण्यात आली. दरम्यान, शिष्टमंडळाने कारखानेही परिपक्व झालेल्या उसाची तोड प्राधान्याने करत असताना साखर कारखान्यांचा उतारा वाढण्याऐवजी वर्षाला कमी होत आहे याकडे लक्ष वेधले. शेतकरी उच्च उतारा देणाऱ्या उसाच्या जातींची लागवड करतात. मग उतारा का घटतो असा सवाल उपस्थित करण्यात आला.