काठमांडू: नेपाळमध्ये सणासुदीच्या आधीच साखरेच्या दरात गतीने वाढ होत आहे. या दरवाढीमुळे ग्राहकांना मोठा फटका बसला आहे.
याबाबत प्रसार माध्यमांतील वृत्तानुसार, दोन आठवड्यांपूर्वी बाजारात साखरेचा दर १०५ रुपये किलो होता. आता साखर १४० रुपये किलो झाली आहे. याव्यतिरिक्त, अनेक स्टोअरमध्ये साखरेचा तुटवडा निर्माण झाला आहे, परिणामी मोठ्या प्रमाणात काळाबाजाराने विक्री सुरू आहे.
याबाबत नेपाळच्या The Annapurna Express मध्ये प्रकाशित वृत्तानुसार, वाणिज्य विभागाने कथित काळ्याबाजाराच्या कारवायांमुळे काठमांडूमधील साखरेचे सर्वात मोठे गोदाम सील केले आहे. हे गोदाम गृहेश्वरी ट्रेडलिंकचे होते. त्यांनी अस्पष्ट लेबलिंगसह साखर साठवली होती असा आक्षेप आहे. . विभागाचे माहिती अधिकारी आनंदराज पोखरेल यांनी गोदाम बंद केल्याच्या वृत्ताला दुजोरा देत येथील साखर गुणवत्ता तपासणीसाठी पाठवण्यात आल्याचे सांगितले.
याबाबत विभागाकडे व्यापारी संतोष खेतान यांनी तक्रार केली होती. उद्योगांकडून कमी दराने साखर खरेदी करून ती काठमांडूमध्ये योग्य बिलांशिवाय जादा दराने विकल्याचा आरोप करण्यात आला होता. साखरेची घाऊक १२७ रुपये किलो दराने विक्री केल्यानंतर खेतान यांनी केवळ १०५ रुपये किलो दराने बिल देण्यात आले. याबाबत पोखरेल म्हणाले, अन्न तंत्रज्ञान व गुणवत्ता नियंत्रण विभागाने सादर केलेल्या अहवालात साखरेच्या गुणवत्तेत कोणतीही अडचण नसल्याचे म्हटले आहे. पण पॅकेजिंगचे कोणतेही तपशील नसल्यामुळे आम्ही उत्पादकांना पत्र पाठवून स्पष्टीकरण मागितले आहे.
दरमयान, आगामी सणासुदीच्या पार्श्वभूमीवर, उद्योग, वाणिज्य आणि पुरवठा मंत्रालयाने मागणी पूर्ण करण्यासाठी ६०,००० टन साखरेच्या आयातीवर सीमाशुल्कात सूट देण्याची मागणी अर्थ मंत्रालयाला केली होती. मात्र, अर्थ मंत्रालयाने सध्या केवळ २० हजार टन साखर आयात करण्यास परवानगी दिली आहे. आगामी सणासुदीच्या हंगामासाठी सॉल्ट ट्रेडिंग कॉर्पोरेशन (एसटीसी) आणि फूड मॅनेजमेंट अँड ट्रेडिंग कंपनी प्रत्येकी १०,००० टन साखर आयात करणार आहे. ही साखर खरेदीची प्रक्रिया सुरू झाली आहे, असे पोखरेल यांनी सांगितले.