मुंबई : महाराष्ट्रातून मान्सूनने माघार घ्यायला सुरुवात केली असली तरी राज्यात संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे भारतीय हवामान खात्याने राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. या पावसाने खरीप पिकांना संजीवनी दिली असून शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. त्याचबरोबर धरणांमधील पाणीसाठ्यात किरकोळ वाढ होताना दिसत आहे.
नवभारत टाइम्समध्ये प्रकाशित वृत्तानुसार, हवामान खात्याने सांगितले की, आगामी २४ तासांत राज्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. येत्या ४८ तासांत मुसळधार पाऊस पडणार असून आजही मुंबई, पुणे, ठाण्यात पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यात ढगाळ वातावरण राहील. बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रावर कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे राज्यात पावसासाठी पोषक वातावरण आहे. त्यामुळे अनेक जिल्ह्यांत परतीचा पाऊस पडेल.
दरम्यान, हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार, दिल्ली, राजस्थान, पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड या राज्यांतून मान्सूनच्या माघारीचा प्रवास सुरू झाला आहे. मध्य प्रदेश, गुजरात, आंध्र प्रदेश या राज्याच्या विविध भागातही मान्सूनची माघार सुरू झाली आहे. ऑक्टोबरच्या अखेरीस राज्यातही मान्सूनच्या पावसाने माघार घेण्यास सुरुवात करेल.