नवी दिल्ली : इस्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये युद्ध सुरू झाले आहे. ‘हमास’ने शनिवारी इस्रायलवर 5000 रॉकेटने हल्ला केला आहे. त्यात इस्रायलमधील एक नागरिक ठार झाल्याची बातमी हाती आली आहे. इस्रायली लष्कराने देशाच्या दक्षिण आणि मध्य भागात सायरन वाजवून जनतेला बॉम्ब आश्रयस्थानांजवळ राहण्याचे आवाहन केले आहे. हमासने दावा केला आहे की, त्यांच्या अतिरेक्यांनी 5,000 हून अधिक रॉकेटने हल्ला चढवला आहे. या हल्ल्यानंतर इस्रायलने युद्धाची घोषणा केली आहे.
गाझा पट्टीतील पॅलेस्टिनी अतिरेक्यांनी शनिवारी दक्षिण इस्रायलमध्ये घुसखोरी केली आणि देशात एकाचवेळी हजारो रॉकेट डागले. या हल्ल्यात आतापर्यंत किमान एक जण ठार आणि अन्य १६ जण जखमी झाले आहेत. इस्रायल-पॅलेस्टाईनमध्ये अनेक महिन्यांपासून वाढलेल्या हिंसाचारानंतर संघर्षाचा उद्रेक झाला आहे. हमासच्या लष्करी शाखेचे नेते मोहम्मद देईफ यांनी ‘ऑपरेशन अल-अक्सा स्टॉर्म’ सुरू झाल्याची घोषणा केली. त्याने रेकॉर्ड केलेल्या संदेशात म्हटले आहे कि, आता बस्स झाले, त्याने पॅलेस्टिनी नागरिकांना लढाईत सामील होण्याचे आवाहन केले. तो म्हणाला की हमासने इस्रायलवर 5,000 हून अधिक रॉकेट डागले आहेत.