करमाळा : मकाई कारखान्याला काही तांत्रिक अडचणींमुळे व काही विघ्नसंतोषी लोकांमुळे शेतकऱ्यांची बिले वेळेवर देता आली नाहीत. मात्र, सभासदांचा आमच्यावर विश्वास आहे. त्यास पात्र राहण्याचे प्रयत्न सुरू आहेत. शेतकऱ्यांची सर्व देणी देण्यास आम्ही कटिबद्ध आहोत, असे प्रतिपादन मकाई कारखान्याचे माजी चेअरमन दिविजय बागल यांनी केले. मकाई कारखान्याच्या २४ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कारखान्याचे चेअरमन दिनेश भांडवलकर होते.
माजी चेअरमन बागल म्हणाले की, लोकनेते स्व. दिगंबरराव बागल यांनी हा कारखाना स्थापन केला आहे. सभासदांच्या विश्वासावर कारखाना चांगली वाटचाल करत आहे. त्यामुळे सभासदांच्या विश्वासाला आम्ही कधीही तडा जाऊ देणार नाही. गेल्यावर्षी उशीरा बिले मिळाल्याने शेतकऱ्यांना त्रास झाला. याबाबत आम्ही दिलगिरी व्यक्त करतो.
यावेळी आदिनाथचे माजी उपाध्यक्ष केरू गव्हाणे, चेअरमन धनंजय डोंगरे, संचालक मोहन गुळवे, दत्ता गायकवाड, राम हाके, माजी उपसभापती लालासाहेब पाटील, माजी संचालक बापूराव कदम, अॅड. दत्तात्रय सोनवणे, काशिनाथ काकडे, सतीश नीळ, अमोल यादव आदी उपस्थित होते. माजी मंत्री स्व. दिगंबरराव बागल यांच्या पुतळ्याचे पूजन कोर्टीचे पोलिस पाटील खंडेराव शेरे यांच्या हस्ते करण्यात आले. केरू गव्हाणे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रभारी कार्यकारी संचालक हरिश्चंद्र खाटमोडे यांनी प्रास्ताविक केले. लहू बनसोडे यांनी सूत्रसंचालन केले. संचालक सतीश नीळ यांनी आभार मानले.