पुणे : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने गेल्यावर्षी दिवाळीसाठी प्रती सभासद ३० किलो साखर दिली होती. मात्र, यंदा यात थेट २० किलो साखरेची कपात करण्यात आली. दिवाळीसाठी प्रति सभासद दहा किलो साखर १५ रुपये दराने देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सभासद संतप्त झाले आहेत. गेल्यावर्षी प्रत्येक सभासदाला सवलतीच्या दरात ३० किलो साखर देण्यात आली होती. मात्र, यंदा फक्त १० किलो साखर देण्यात येणार असल्याचे कारखान्याने परिपत्रक काढले आहे. यावरून गेले दोन दिवस सोमेश्वर साखर कारखान्याच्या सभासदांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे.
दरम्यान, गेल्यावर्षीच्या वार्षिक सभेत हा निर्णय घेण्यात आला होता, असा दावा कारखाना प्रशासनाचे म्हणणे आहे. मात्र, कारखान्याने या निर्णयाचा फेरविचार करावा, अशी मागणी सभासदांनी केली आहे. याबाबत, प्रगतशील बागायतदार उदयसिंह काकडे म्हणाले की, कारखान्याने ज्या पद्धतीने महाराष्ट्रात उच्चांकी ऊस दर देऊन नावलौकिक प्राप्त केला आहे. त्या पद्धतीने सभासदांना गेल्यावर्षीएवढीच साखर देऊन दिवाळी गोड करावी, अशी मागणी होत आहे.