कोल्हापूर : यंदाचा गाळप हंगाम कधी सुरु होणार याचा निर्णय या आठवड्यात होणाऱ्या मंत्री समितीच्या बैठकीत होईल. मात्र, उसाची टंचाई आणि उतारा घटण्याच्या शक्यतेने हंगाम सुरु करण्याबाबत मत – मतांतरे आहेत. राज्य सरकार हंगाम १ नोव्हेंबरपासून सुरू करण्यास अनुकूल आहे. मात्र काही कारखानदारांसह ‘विस्मा’ने यंदाचा हंगाम १५ ऑक्टोबरपासून सुरू करावा, अशी मागणी केली आहे. सद्यस्थितीत अनेक जिल्ह्यांत गुऱ्हाळघरे, खांडसरी सुरू झाल्या आहेत. अनेक शेतकरी गुऱ्हाळघरे, खांडसरीला ऊस पाठवीत आहेत. त्याचा फटका साखर कारखान्यांना बसू शकतो. त्यामुळे १५ ऑक्टोबरपासून गळीत हंगाम सुरू करावा अशी मागणी ‘विस्मा’ने केली आहे.
देशातील एकूण उत्पादनापैकी सुमारे एक तृतीयांश साखर उत्पादन महाराष्ट्रात होते. यंदा राज्यातील साखर उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे. पावसाअभावी उसाचे क्षेत्र घटले आहे. साखर कारखान्यांनी गाळप क्षमता वाढवली आहे. त्यामुळे यावर्षी ऊस हंगाम जेमतेम तीन महिने चालण्याची शक्यता आहे. कोल्हापूर, सांगलीसह सातारा, सोलापूर या ऊस पट्याला पावसाचा फटका बसला आहे.
ऑक्टोबर हीटमुळे उसाला पुन्हा पाण्याची गरज लागेल. ही परिस्थिती पाहता गाळप हंगामाबाबत मंत्री समिती काय निर्णय घेणार याकडे साखर उद्योगाचे लक्ष लागले आहे.