पुणे : सध्या ऊस तोडणी मजुरांना 273 रुपये प्रति टन, तर हार्वेस्टरना 400 रुपये दर मिळत आहे. ऊस तोडणी कामगारांनाही हार्वेस्टरच्या दराप्रमाणे 400 रुपये प्रतिटन दर मिळावा, अशी मागणी उसतोड कामगारांकडून केली जात आहे. दरम्यान, ऊसतोडणी मजूर, मुकादम व वाहतूकदारांच्या प्रश्नांबाबत सरकारने अथवा साखर संघाने चर्चेतून सकारात्मकता दाखविली नाही, तर ऊसतोडणी संघटनेच्या माध्यमातून माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या निर्णयाबरोबर पाथर्डी तालुका राहील. राज्यव्यापी संपाची हाक दिल्यास आम्ही मुंडेंबरोबर पूर्ण ताकदीने उभे राह, असे आमदार मोनिका राजळे यांनी सांगितले.
पाथर्डी तालुक्यात सुमारे पन्नास हजार ऊसतोड कामगार असून त्यांचा या संपाला पाठिंबा मिळावा यासाठी आ. राजळे यांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. तीन वर्षांपूर्वी साखर संघ आणि ऊसतोड कामगार संघटना यांच्यात पगारवाढीचा करार झाला होता. त्यानंतर महागाई वाढूनही पगारवाढ झाली नाही. चालू हंगामात संपावर जाण्याचा निर्णय झाला. बैठकीत अनेकांनी डिझेलचे दर वाढले. मात्र, वाहतुकीचे दर वाढले मात्र, अपघात परवडत नाही, असा सूर आळवत कोणत्याही परिस्थितीत संप करण्याचा निर्णय घेण्यात आला. तीन वर्षांपूर्वी झालेल्या साखर संघ व ऊसतोड मजूर संघटना यांच्यात वेतनवाढीचा करार झाला होता. त्यानंतर महागाई वाढूनही वेतनवाढ मिळत नसल्याने चालू हंगामात संप करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आमच्या मागण्या पूर्ण मान्य होत नाहीत, तोपर्यंत आम्ही संप मागे घेणार नाही. ऊस तोडणी मजूर, मुकादम व वाहतूक संघटनांच्या संपाला पंकजा मुंडे यांचा पाठिंबा असून आम्ही कोणत्याही कारखान्याचा चाक फिरू देणार नाही, आमचा हक्क घेतल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही, असेही विविध वक्त्यांनी सांगितले.
बैठकीस ऊसतोडणी कामगार संघटेनेचे बीड जिल्हाध्यक्ष गोरक्ष रसाळ, सचिव कृष्णा तिडखे, राज्य सचिव सरेश वनवे, संजय किर्तने, ऊसतोडणी मुकादम संघटनेचे तालुकाध्यक्ष पिराजी किर्तने, वामन किर्तने, माणिक बटुळे, आजीनाथ कराड, रामनाथ ढाकणे, बाळासाहेब गोल्हार, भाऊराव बटूळे, बाळासाहेब बटूळे, महादेव किर्तने, संतराम दराडे, माणिक खेडकर, नितिन किर्तने, धनंजय बडे, अशोक खरमाटे, महादेव जयाभाये आदी उपस्थित होते.