कोल्हापूर : यंदाच्या गळीत हंगामात उसाला पाच हजार रुपये दर मिळालाच पाहिजे, अशी मागणी शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी केली. याशिवाय गेल्या हंगामातील उसाला प्रती टन १००० रुपये दुसरा हप्ता देण्याची मागणी त्यांनी केली. सरकारने शेतकऱ्यांना दर देण्यास कारखान्यांना भाग पाडावे, अन्यथा दोन कारखान्यांमधील अंतराची अट रद्द करावी या मागणीचा त्यांनी पुनरुच्चार केला.
शेतकरी संघटनेतर्फे शाहू स्मारक भवनात आयोजित परिषदेत पाटील यांनी एफआरपी कायद्यावर टीका केली. ते म्हणाले की, दहा वर्षांपूर्वी साखर कारखानदारांनी काही संघटनांना हाताशी धरून केलेल्या कायद्याचे दुष्परिणाम दिसत आहेत. सध्या महागाईचा आगडोंब उसळला आहे. डिझेल, पेट्रोलने शंभरी गाठली आहे. खतांचे दर गगनाला भिडले. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांची कोंडी झाली आहे.
ॲड. माणिक शिंदे म्हणाले की, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदानापोटी ५० हजार रुपये द्यावेत. अनेकांना पैसे मिळालेले नाहीत. यासाठी जिल्हा उपनिबंधक कार्यालयासमोर आंदोलन केले जाईल. शेतकऱ्यांनी गोपीनाथ मुंडे ऊस तोडणी महामंडळाची प्रतिटन दहा रुपये होणारी कपात रद्द करावी, शेतकऱ्यांना कर्ज, वीज बिलातून मुक्त करा, वन्यप्राणी संरक्षण कायदा रद्द करा आदी मागण्या केल्या. शिवाजी नांदखिले, शर्वरी पवार, लक्ष्मण पाटील, नंदकुमार पाटील, महादेव कोरे, मधुकर पाटील, जयकुमार भाट, श्रीकांत घाटगे यांची यावेळी भाषणे झाली.