कोल्हापूर : यंदा पावसाच्या कमतरतेमुळे उसाचे उत्पादन घटण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. अनेक साखर कारखान्यांनी आपली गाळप क्षमता वाढवली आहे. कारखाना पूर्ण क्षमतेने चालविण्यासाठी कारखानदारांना उसाची टंचाई जाणवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील काही साखर कारखान्यांनी ‘लकी ड्रॉ’ योजना जाहीर केल्या आहेत. त्यामध्ये पुणे जिल्ह्यातील विघ्नहर साखर कारखाना, कोल्हापूर जिल्ह्यातील तात्यासाहेब कोरे वारणा साखर कारखाना आघाडीवर आहे. श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या ऊस विकास योजनेंतर्गत शेतकरी मेळावा व बुलेट लकी ड्रॉ सोडत कार्यक्रम दि.२१ सप्टेबर २०२३ रोजी झाला.
…अशी आहे वारणा कारखान्याची योजना
तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखान्याच्या वार्षिक सभेत कारखान्याचे नेते तथा आमदार डॉ. विनय कोरे यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी ‘लकी ड्रॉ’ योजना जाहीर केली आहे. गाळप हंगाम सुरु करण्यापूर्वी मार्च महिन्यातील तोडीसाठी नोंद करणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेत सहभागी होता येणार आहे. १ मार्च ते १५ मार्च या कालावधीत एकरी उसाचे 50 टन उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना बुलेट देण्यात येणार आहे. तर एक मार्च ते 30 मार्च या कालावधीत एकरी 30 टन उत्पादन घेण्याऱ्या 5 शेतकऱ्यांना परदेशवारी करण्याची संधी मिळणार आहे. परदेशवारी करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 टक्के अनुदान कारखान्यामार्फत देण्यात येणार आहे. ही सर्व बक्षिसे लकी ड्रोच्या माध्यमातून देण्यात येणार आहेत. लकी ड्रोची घोषणा होताच तब्बल दीड हजार शेतकऱ्यांनी उसाची नोंदणी केली आहे.
उसाच्या ‘संभाव्य’ टंचाईने कारखानदार धास्तावले…
अपेक्षित पाऊस न झाल्याने उसाची अपेक्षित वाढ झालेली नाही. त्यामुळे एकरी उत्पादन घटणार आहे. कारखानदारांमध्ये त्यामुळे चिंतेचे वातावरण आहे. यंदा उसाची टंचाई भासणार आहे. जर कारखाना दीर्घकाळ चालला तर ते फायद्याचे ठरते. त्यामुळे कारखानदार उसासाठी सभासदांना, इतर शेतकऱ्यांना विविध प्रलोभने दाखवू लागले आहेत. ऐन वाढीच्या कालावधीत पावसाने दडी मारल्याने उसाची वाढ चांगली झालेली नाही. याचा फटका उसाच्या उताऱ्याला बसेल. कारखान्यांना देखील उसासाठी धावपळ करावी लागेल. यातूनच काही कारखान्यांनी ऊस पुरवठादारांना विविध बक्षिसे, पारितोषिके, लकी ड्रॉ, अशी प्रलोभने दाखविण्यास सुरुवात केलेली आहे. राज्यातील अन्य कारखानेदेखील ‘वारणा’प्रमाणे शेतकऱ्यांना लकी ड्रॉ योजना आणण्याची शक्यता आहे.