बीड : यंदाच्या गळीत हंगामात ऊस तोडणी मजूर, मुकादम आणि वाहतूक संघटनांनी दरवाढीसाठी एक नोव्हेंबरपासून संपाचा इशारा दिला आहे. गळीत हंगामापूर्वीच विविध मागण्यांसाठी ऊस तोडणी कामगार संघटना आक्रमक झाल्या आहेत. याप्रश्नी माजलगाव (जि. बीड) येथे महाराष्ट्र श्रमिक ऊस तोडणी व वाहतूक कामगार संघटनेने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
राज्यात केन हार्वेस्टरप्रमाणे ऊसतोडणी मजूरांना प्रती टन ४०० रुपये दर मिळावा, यासह इतर मागण्यांसाठी राज्यभरातील ऊस तोडणी मजूर संघटनांनी आंदोलनाची हाक दिली आहे. सध्या राज्यात ऊसतोडणी मजुरांना प्रती टन २७३ रुपये मजुरी मिळते. मात्र, गुजरात, तेलंगाणा, आंध्रप्रदेश आणि तामिळनाडू या राज्यांमध्ये सरासरी ४०० रुपये प्रती टन दर मिळत आहे. महाराष्ट्रात हार्वेस्टरला ४०० रुपये प्रती टन दर दिला जातो, तेवढाच दर ऊसतोडणी मजूरांना मिळावा अशी मागणी केली आहे.
दरम्यान, भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत नुकतीच गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली होती. बैठकीत संपाचा निर्णय घेण्यात आला. शेगाव-पाथर्डीच्या आमदार मोनिका राजळे यांनीदेखील संपाला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे ऊस तोडणी मंजूर ऊसतोड कामगार संघटनेच्या मागण्यावरून संघर्ष होण्याची शक्यता आहे. तीन वर्षांपूर्वी साखर संघ आणि ऊसतोड मजूर संघटना यांच्यात केलेला वेतनवाढीचा करार संपुष्टात आला. यंदा नव्या दराने करार करावा अशी मागणी केल्याचे महाराष्ट्र श्रमिक ऊस तोडणी व वाहतूक कामगार संघटनेचे अध्यक्ष जीवन राठोड यांनी सांगितले.