बेळगाव : राज्यातील सर्व साखर कारखान्यांचा गेल्या हंगामातील हिशेब तातडीने घेतला जाईल. उसाला एफआरपी अधिक जादा रक्कम देऊनच यंदाचा गळीत हंगाम सुरू करण्यात येईल, असे आश्वासन कर्नाटकचे साखरमंत्री शिवानंद पाटील यांनी दिले. स्वाभिमानी शेतकरी संघटना व कर्नाटक रयत संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. त्यावेळी शिष्टमंडळाला मंत्री पाटील यांनी हे आश्वासन दिले.
बेळगाव येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिटन ४०० रुपये दुसरा हप्ता द्यावा या मागणीसाठी हजारो ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा सोमवारी धडक मोर्चा काढला. यावेळी, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर साखरेला चांगला दर मिळत असल्याने जादा दर मिळावा, वजनकाटे ऑनलाइन करावेत, ऊस वाहतुकदारांची फसवणूक केलेल्या मुकादमांवर कारवाई करा, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या.
कर्नाटक राज्यातील ऊस उत्पादक व वाहतूकदारांच्या प्रश्नाबाबत तातडीने मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक घेतली जाईल, असे बैठकीत मंत्री शिवानंद पाटील यांनी सांगितले. दरम्यान, कर्नाटक सरकारने गेल्यावर्षी इथेनॉल उत्पादन करणाऱ्या कारखान्यांनी एफआरपीपेक्षा १५० रुपये प्रती टन व इतर कारखान्यांनी १०० रुपये जादा दर देण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाची अंमलबजावणी करण्याची मागणी करण्यात आली. मंत्री पाटील यांनी ऊस उत्पादक शेतकरी व तोडणी वाहतूकदारांसोबत सकारात्मक चर्चा करत राज्य सरकारकडून सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.