अहमदनगर : देवीभोयरे येथील पारनेर सहकारी साखर कारखान्याची मालमत्ता विकत घेणाऱ्या पुणे येथील क्रांती शुगर कारखान्याला गाळप परवाना देण्यात येऊ नये, अशी मागणी पारनेर बचाव समितीने केली आहे. याबाबत साखर आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांना निवेदन देण्यात आले आहे. गेल्या सात वर्षांपासून क्रांती शुगरने पारनेर कारखान्याचा केंद्रीय औद्योगिक परवान्याचा बेकायदा वापर केल्याचा आरोप बचाव समितीने केला आहे.
पारनेर बचाव समितीने दिलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार, २०१५ मध्ये राज्य सहकारी बँकेने पारनेर सहकारी साखर कारखान्याचे खाजगीकरण करून तो पुणे येथील क्रांती शुगर या कंपनीला विक्री केला. क्रांती शुगरने पारनेरच्या मालमत्तेवर ताबा घेऊन सात गाळप हंगाम घेतले. मात्र, पारनेर कारखान्याने मालमत्तेबाबत आक्षेप घेतले होते. या प्रकरणाचा निकाल जून महिन्यात पारनेर कारखान्याच्या बाजूने लागला. राज्य शासनाच्या निकालाविरोधात क्रांती शुगरने उच्च न्यायालयात अपिल केले आहे. दरम्यान, कारखाना बचाव समितीने घेतलेल्या माहितीनुसार कंपनीने परस्पर औद्योगिक परवाने वापरले आहेत.
पारनेर सहकारी कारखान्याची काही मालमत्ता क्रांती शुगरला हस्तांतरण करताना झालेल्या करारात कोणतेही परवाने हस्तांतरण झालेले नाहीत. पारनेर कारखान्याच्या संमती विना केंद्रीय औद्योगिक परवाना क्रांती शुगरने सात वर्षांपासून वापरलेला आहे. क्रांती शुगरने उभारलेल्या नवीन युनिटसाठीही हाच परवाना वापरण्यात आलेला आहे. ही बाब बेकायदा आहे. म्हणून यावर्षीचा गाळप परवाना क्रांती शुगर यांना देण्यात येऊ नये, अशी मागणी पारनेर बचाव समितीच्या शिष्टमंडळाने पुणे येथील साखर आयुक्तांची भेट घेऊन केली आहे. परवाना दिल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा पारनेर बचाव व पुनरुज्जीवन समितीने दिला आहे.