परभणी : राज्यातील साखर कारखान्यांनी चालू गळीत हंगामात उसाला एकरकमी ३३०० रुपये प्रती टन पहिली उचल द्यावी. ही उचल मिळाल्याशिवाय कारखान्यांचे धुराडे पेटू देणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक-अध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला. ताडकळस (ता. पूर्णा) येथे मंगळवारी संघटनेतर्फे आयोजित ऊस सोयाबीन व कापूस परिषदेत ते बोलत होते. मराठवाड्यामध्ये दुष्काळ जाहीर करून कर्जमुक्ती करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली.
माजी खासदार शेट्टी म्हणाले की, केंद्र शासनाचे आयात-निर्यात धोरण शेतकऱ्यांच्या ऊस सोयाबीन व कापूस या पिकांचे भाव पडण्यास कारणीभूत आहे. केंद्र सरकारने उद्योगपतींच्या हितासाठी पाम तेल आणि कापसाच्या गाठी आयात करून हंगामामध्ये सोयाबीन, कापसाचे भाव पाडले. सरकारने सोयाबीनला ९००० रुपये व कापसाला १२३०० रुपये दर स्थिर ठेवावा. उसाला मागील हंगामाचे एफआरपी सोडून प्रति टन अतिरिक्त 400 रुपये जादा देण्यात यावेत आदी मागण्या मान्य झाल्या नाहीत तर लोकप्रतिनिधींना मतदारसंघात फिरू देणार नाही, असा इशाराही शेट्टी यांनी दिला.
शेट्टी म्हणाले की, यंदा सोयाबीनवर पडलेल्या ‘येलो मोझॅक’ रोगाचा पीकविम्याच्या नुकसान भरपाईत समावेश करावा. नैसर्गिक आपत्ती जाहीर करून भरपाई द्यावी. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी प्रदेशाध्यक्ष प्रकाश पोपळे, युवक प्रदेशाध्यक्ष दामू अण्णा इंगोले, माजी महिला आघाडी प्रदेशाध्यक्ष रसिका ढगे, जिल्हाध्यक्ष किशोर ढगे उपस्थित होते. रामप्रसाद गमे, गजानन तुरे, मुंजाभाऊ लोडे, पंडितअण्णा भोसले, रामा दुधाटे, नवनाथ दुधाटे, विष्णू दुधाटे, माउली शिंदे, उद्धवराव जवंजाळ, निर्वल काका, नामदेव काळे, विठ्ठल चोखट, विकास भोपाळे आदींसह शेतकरी उपस्थित होते.