मुंबई : महाराष्ट्रातील साखर हंगाम एक नोव्हेंबरपासून सुरू होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील शेतकरी संघटनांनी ऊस दर जाहीर करण्याची मागणी केली आहे. दुसरीकडे कर्नाटक राज्यातील कारखान्यांनी उसाचा खरेदी दर जाहीर केला आहे. कर्नाटकमधील सौंदत्ती तालुक्यातील रेणुका साखर कारखान्याने सर्वाधिक ३,७७३ दर जाहीर केला आहे. त्यापाठोपाठ चिकोडी तालुक्यातील वेंकटेश्वर कारखान्याने ३६९३ रुपये दर दिला आहे. तर कर्नाटकमधील २७ कारखान्यांनी ३,००० रुपयांपेक्षा जास्त दर जाहीर केला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनाही उसाला चांगला भाव मिळण्याची अपेक्षा आहे.
राज्यात गेल्या हंगामात २११ पैकी १९८ साखर कारखान्यांनी ३,००० रुपयांपेक्षा कमी दर दिला आहे. तर १३ कारखान्यांनी ३००० पेक्षा जास्त दर दिला. बारा कारखान्यांनी दोन हजारापेक्षा कमी दर दिला. कर्नाटकमध्ये उसाचे क्षेत्र महाराष्ट्राच्या तुलनेत कमी आहे. त्यामुळे कर्नाटकातील कारखान्यांनी जास्त दर जाहीर केला आहे. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या एफआरपीनुसार १०.५ टक्केसाठी ३१५० रुपये दर आहे. उताऱ्यानुसार ०.१ टक्केसाठी ३०.७ रुपये प्रती टन जादा दर मिळेल.