सांगली : गेल्यावर्षीच्या उसाला ४०० रुपये दुसरा हप्ता द्यावा या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने राज्यभर आंदोलन सुरू केले आहे. सांगली जिल्ह्यातही शेतकरी संघटनेने आक्रमक होत आंदोलन सुरू केले आहे. ‘स्वाभिमानी’च्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी वाळवा तालुक्यात ताकारी येथे क्रांती कारखान्याचे ट्रक रोखले. कारखान्यातील ऊत्पादीत अल्कोहोलची चार ट्रककडून मुंबईला वाहतूक करण्यात येत होती. कारखानदारांनी गेल्या हंगामातील उसाला ४०० रुपये दुसरा हप्ता द्यावा या मागणीसाठी माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानी संघटनेने आंदोलन सुरू केले आहे.
सांगली जिल्ह्यात प्रत्येक साखर कारखान्यावर ढोल बजाव आंदोलन केले होते. मागण्यांकडे दुर्लक्ष केले तर कारखान्यातून बाहेर पडणारी साखर, इतर उपपदार्थ रोखण्याचा इशारा संघटनेने दिला होता. आता संघटनेने आंदोलन तीव्र केले आहे. याबाबत स्वाभिमानीचे वाळवा तालुका अध्यक्ष भागवत जाधव यांनी सांगितले की, जिल्ह्यातील साखर कारखान्यांना उसाचा दुसरा हफ्ता ४०० रूपये द्यावा. अन्यथा आंदोलन तीव्र केले जाईल. क्रांती कारखान्याने कोणताही निर्णय न होता उपपदार्थ वाहतूक सुरू ठेवली होती. स्वाभिमानीच्या वतीने कारखान्याचा अल्कोहोलचा ट्रक परत पाठवण्यात आला आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष पोपट मोरे, भागवत जाधव, एस. यू. संदे , जगन्नाथ भोसले, अनिल करळे, प्रताप पाटील आदी उपस्थित होते.