नवी दिल्ली : इस्रायल-हमास युद्ध सातव्या दिवसात प्रवेश करत असताना इस्रायलने उत्तर गाझामधील सुमारे 1.1 दशलक्ष लोकांना स्थलांतरित करण्याचे आदेश दिले आहेत, असे संयुक्त राष्ट्राने शुक्रवारी सांगितले. इस्रायली सैन्याने हमास शासित गाझा पट्टी हवाई हल्ले करून उद्ध्वस्त केली आणि संभाव्य जमिनीवर आक्रमण करण्यापूर्वी अन्न, पाणी, इंधन आणि वीजपुरवठा खंडित केला आहे. इस्रायलने गाझा पट्टी चोहोबाजूंनी कोंडी केली आहे.
इस्रायलने इजिप्तची गाझाच्या 2.3 दशलक्ष लोकांना केली जाणारी मदत रोखल्यानंतर आंतरराष्ट्रीय मदत करणाऱ्या संघटनानी गाझा पट्टीमधील सर्वसामान्य लोकांबद्दल चिंता व्यक्त केली आहे. इस्रायल-हमास युद्धात 7 ऑक्टोबर 2023 रोजी हमासने अचानक हल्ला केल्यापासून दोन्ही बाजूंनी किमान 2,800 लोक मारले गेले आहेत.
पॅलेस्टिनी वृत्तसंस्था वाफा यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनानुसार, पॅलेस्टिनी राष्ट्राध्यक्ष महमूद अब्बास यांनी गाझा पट्टीतील लोकांचे स्थलांतर करण्यास साफ विरोध केला आहे. अब्बास इस्रायल यांनी पॅलेस्टिनींना “दुसऱ्या नकबा” आपत्तीचा इशारा दिला आहे. इस्रायलच्या सैन्याने शुक्रवारी उत्तर गाझा येथून दहा लाखांहून अधिक लोकांना 24 तासांच्या आत दक्षिणेकडे स्थलांतरित होण्यास सांगितले आहे. कारण इस्रायलने जमिनीवरून हल्ला करण्याची तयारी सुरु केली आहे.
नकबा म्हणजे काय?
1948 मध्ये मोठ्या प्रमाणावर पॅलेस्टिनी लोकांचे विस्थापन झालेल्या “नकबा” किंवा “आपत्ती”ला यंदा 75 वर्षे पूर्ण होत आहेत. ज्याच्या स्मरणार्थ पॅलेस्टाईन दरवर्षी 15 मे रोजी “अल नकबा” साजरा करतो. या वर्षी “नकबा”चा 75 वा वर्धापन दिन पहिल्यांदाच न्यूयॉर्क येथील संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात साजरा करण्यात आला.