कोल्हापूर : राज्याचे साखर धोरण ठरवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मंत्रालयामध्ये 17 ऑक्टोबर 2023 रोजी बैठक आयोजित करण्यात आली असली, तरी या बैठकीला काहीच अर्थ नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे साखर सम्राटांच्या ताटाखालचे मांजर झाल्याची घणाघाती टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली. साखर कारखानदारांकडे साखरेला मिळालेला चांगला दर, इथेनॉलमधून मिळालेला पैसा याचा विचार करता साडेचार हजार कोटी शिल्लक आहेत. आम्ही त्यापैकी प्रति टन चारशे रुपयांची मागणी करत आहे, मात्र साखर कारखानदार द्यायला तयार नाहीत, अशी टीका शेट्टी यांनी केली. साखर सम्राटांसमोर देवेंद्र फडणवीस यांचे सुद्धा काही चालत नाही, असेही ते म्हणाले.
उत्पन्न वाटप सूत्राचा (रेव्ह्यून्यू शेअरींग फॉर्म्युला-आरएसएफ) साखर कारखानदारांनी सोयीने वापर करून घेत असल्याने ही फसवाफसवी आहे हे आम्ही मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री यांना अनेकवेळा पटवून देऊनही काहीच झालेले नाही. त्यांचे साखर कारखानदारासंमोर काही चालत नाही, अशी टीकाही त्यांनी केली. राजू शेट्टी म्हणाले की, मुख्यमंत्र्यांना आम्ही जनतेची नाळ ओळखणारे समजत होतो. मात्र, ते साखर सम्राटांच्या ताटाखालील मांजर झाले आहेत. एकरकमी एफआरपी देण्यासाठी त्यांच्यासोबत बैठक झाल्यानंतर शासन निर्णय होण्यासाठी त्यांच्याकडे अनेकवेळा उंबरे झिजवले. मात्र, तो निर्णय साखर सम्राटांच्या दबावामुळे होऊ शकला नाही. त्यामुळे साखर कारखानदारांसोबतच्या बैठकीत साखर कारखानदार म्हणतात बैठक झाली, मात्र शासन निर्णय कोठे झाला? त्यामुळे धोरण काही असले तरी अजित पवारांच्या मनात असेल, साखर कारखानदारांच्या मनात असेल तेच राज्याचे धोरण असेल हे मला माहित आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे, फडवणीस फक्त म म म्हणण्याचं काम करणार आहेत. त्या बैठकीतून काहीही साध्य होणार नाही, अशी टीका त्यांनी केली.