सोलापूरमध्ये पावसाअभावी ऊस उत्पादनात घट

सोलापूर : यंदा जिल्ह्यात अपेक्षेपेक्षा कमी पावसाचा परिणाम ऊस उत्पादनावर पाहायला मिळत आहे. सर्वात जास्त परिणाम मोहोळ तालुक्यात दिसू लागला आहे. चार साखर कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात ऊस लागवड क्षेत्र सुमारे १४ हजार ५८७ एकरने घटले आहे. गेल्यावर्षी ९६,६५२ एकर क्षेत्रात लागवड करण्यात आली होती. मात्र, यंदा ८२ हजार ६५ एकर क्षेत्रात उसाची नोंद झाली आहे.

तालुक्यात आष्टी शुगर, भीमा-टाकळी सिकंदर, जकराया-वटवटे, लोकनेते- अनगर हे चार साखर कारखाने आहेत. आष्टी शुगरकडे २८,७५० एकर ऊस क्षेत्र नोंद झाले आहे. तर भीमा कारखान्याकडील ऊस लागवड २४,२५० एकरवरून १९,८५० एकरपर्यंत खालावली आहे. लोकनेते कारखान्याकडे सर्वात कमी १६ हजार एकर ऊस लागवड नोंद असून जकराया कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील ऊस लागवड २५ हजार ५०० एकरवरून १७ हजार ५०० एकरवर आली आहे. पाण्याची पुरेशी व्यवस्था नसल्याने शेतकऱ्यांनी नवीन ऊस लागवडीकडे पाठ फिरवल्याचे चित्र आहे. सप्टेंबर महिन्यात चांगला पाऊस झाला आहे. उजनी धरण साठ टक्के भरले आहे. या महिन्यापासून उसाच्या लागवडी वाढण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here