22 दिवस, 37 कारखाने आणि 522 किलोमीटर प्रवास…स्वाभिमानीचा ऊस दरासाठी उद्यापासून ‘आक्रोश’

कोल्हापूर: स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मागील वर्षी गाळप केलेल्या उसाला प्रति टन अतिरिक्त 400 रुपये दर देण्याची मागणी केली आहे. 17 ऑक्टोबर 2023 पासून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी संघटनेचे अध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी 22 दिवस, 522 किलोमीटर आक्रोश पदयात्रा करत 37 साखर कारखान्याच्या दारात जाऊन 400 रुपयांची मागणी करणार आहेत. साखर कारखान्यांकडे शेतकऱ्यांच्या हक्काचा पैसा आहे, आणि त्यांनी तो दिलाच पाहिजे. शेतकऱ्यांना न्याय मिळाल्याशिवाय आता माघार नाही, असे राजू शेट्टी यांनी ‘चीनीमंडी’शी बोलताना सांगितले.

आक्रोश पदयात्रेचा समारोप आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेची 22 वी ऊस परिषद 7 नोव्हेंबर 2023 रोजी होणार आहे. जोपर्यंत 400 रुपयांचा दुसरा हप्ता दिला जात नाही, तोपर्यंत एकाही साखर कारखान्याची ऊस तोड सुरू होणार नाही. त्यामुळे पदयात्रेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन माजी खासदार शेट्टी यांनी केले आहे.

मागील वर्षी 522 किलोमीटर परिसरात येणाऱ्या 37 साखर कारखान्यांनी तब्बल 3 कोटी टन उसाचे गाळप केले आहे. म्हणजेच त्यांच्याकडून 1200 कोटी रुपये येणे आहेत. ते 1200 कोटी रुपये आले तर ते 15 लाख ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या घरात जाणार आहेत आणि ते पैसे नाही आले तर ते केवळ 37 कुटुंबातच पैसे राहणार आहेत, असे राजू शेट्टी यांनी सांगितले.

यात्रेचा उद्या (17 ऑक्टोबर) शिरोळ तालुक्यात शुभारंभ होईल. ऊसाचा दुसरा हप्ता प्रतिटन 400 रुपये, साखर कारखान्यांचे वजन काटे डिजिटल केल्याशिवाय ऊस गाळपास परवानगी देऊ नये, या मागणीसाठी पदयात्रा काढण्यात येणार आहे. शिरोळ येथील दत्त साखर कारखान्यापासून सकाळी आठ वाजता पदयात्रेला प्रारंभ होणार आहे. ही पदयात्रा गुरूदत्त, जवाहर, घोरपडे, शाहू, वारणा, क्रांती, वसंतदादा, राजारामबापू, आदी 37 साखर कारखान्यांवर 22 दिवस 522 किलोमीटर निघेल.

 

7 नोव्हेंबर रोजी जयसिंगपूर येथील ऊस परिषदेत ही पदयात्रा सामील होणार आहे. सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांतील साखर कारखान्यांनी केवळ एफआरपीच दिली आहे. पुणे, अहमदनगर जिल्ह्यात 8 साखर कारखान्यांनी एफआरपीपेक्षा 400 ते 500 रुपये अधिक दिले आहेत. दुसरीकडे, कोल्हापूर जिल्ह्यात साखर कारखान्यांची रिकव्हरी पुणे जिल्ह्यापेक्षा जास्त आहे, तरीही दुसरा हप्ता देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here