पुणे : साखर कारखान्यांनी औद्योगिक सुरक्षिततेबाबतच्या नियमांची अंमलबजावणी करावी आणि नियमांची अंमलबजावणी न करणाऱ्या कारखान्यांवर कायद्याचा बडगा उगारावा, असे स्पष्ट निर्देश राज्याचे साखर आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिले आहेत. त्यांनी साखर कारखान्यांतील प्रत्येक कामगाराचा विमा काढावा, अशी सूचनाही केली आहे.
पुणे येथे ‘साखर कारखाने व औद्योगिक सुरक्षा’ या विषयावर आयोजित कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. राज्य औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघ व वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने (विस्मा) यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
‘विस्मा’चे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे, साखर संघाचे व्यवस्थापकीय संचालक संजय खताळ, औद्योगिक सुरक्षा संचालक देवीदास गोरे व अपर संचालिका शारदा होदुले, सहसंचालक अखिल घोगरे व संजय गिरी यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रत्येक साखर कारखान्याने आता सुरक्षितता अधिकारी (सेफ्टी ऑफिसर) नियुक्त करावा, अशी सूचना करत डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार म्हणाले कि, औद्योगिक सुरक्षेकडे काही साखर कारखान्यांचे दुर्लक्ष झाल्याचे दिसते. कारखान्यातील अपघात किंवा दुर्घटना टाळण्यासाठी सुरक्षा व्यवस्थापन अत्यंत महत्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.
‘विस्मा’चे अध्यक्ष ठोंबरे म्हणाले की, खी साखर कारखाने कामगारांना हेल्मेट व सुरक्षा बूट यासारख्या मुलभूत गोष्टीदेखील पुरवत नाहीत. कामगारांची निष्काळजी वृत्ती व आवश्यक सुरक्षा साधनांचा अभाव यातून साखर कारखान्यांमधील अपघात वाढत आहेत.
साखर संघाचे संजय खताळ म्हणाले कि, अपघातांच्या घटना वाढत असताना अनेक साखर कारखान्यांमध्ये सुरक्षा अधिकारीदेखील नसल्याची वस्तुस्थिती आहे. ते म्हणाले, साखर कारखान्यांमध्ये १३६ आसवनी, १४६ इथेनॉल निर्मिती प्रकल्प उभारले गेले आहेत.यामध्ये काम करणाऱ्या कामगारांच्या सुरक्षेला प्राधान्य दिले पाहिजे.