मुंबई : ऐन सणासुदीच्या काळात खाद्यतेलाच्या किमतींमध्ये २५ रुपयांपासून ते अगदी १०० रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. धान्याच्या किमतींनुसार काही तेलांचे दर वाढले तर काहींचे दर कमी झाले. दिवाळीत सर्वांच्याच घरी गोड, फराळाचे पदार्थ बनवले जातात. त्यासाठी पाम तेलाचा वापर केला जातो. त्यामुळे, आताच्या दरवाढीने सर्वसामान्यांच्या खिशाला मोठा फटका बसणार आहे.
मध्यमवर्गीयांकडून अधिक वापरल्या जाणाऱ्या पाम तेलाच्या किमती वाढल्या आहेत. मोहरी, सरकीच्या किमती वाढल्या आहेत. मात्र, सोयाबीन, शेंगदाणा आणि रिफाईंड ऑइलच्या किमती कमी झाल्या आहे. देशात उत्पादनाच्या तुलनेत मागणी वाढल्याने दर वाढल्याचे सांगण्यात येते. मोहरीच्या दरांत १०० रुपयांची वाढ झाली. तर शुद्ध मोहरीच्या तेलात ४५ रुपयांची वाढ झाली. कच्च्या पामतेलाच्या किमतीदेखील १०० रुपयांनी वाढल्या आहेत. सरकी तेलाचे दर २५ रुपयांनी वाढले आहेत. सोयाबीन तेलाच्या किमतीत १०० रुपयांची घट झाली आहे.
दिवाळीच्या कालावधीत फराळ आणि विविध प्रकारची मिठाई बनवण्यासाठी तेलाचा जास्तीत जास्त वापर केला जातो. मिठाईच्या दुकानांत, अनेक कुटुंबांमध्येही मोहरी, पाम आणि सरकी या तेलांचा जास्त वापर केला जातो. बाजारात आता मागणी वाढत असल्याने तेलाच्या किमती वाढत आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसणार आहे.