नंदुरबार : शहादा तालुक्यातील नागाई शुगर्स प्रा.लि. कारखान्याने १,३०० शेतकऱ्यांची ऊस बिले थकवली आहेत. थकीत कोट्यवधी रुपये मिळावेत यासाठी या शेतकऱ्यांनी तीव्र निदर्शने केली. नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनावेळी पालकमंत्री अनिल पाटील यांनी मध्यस्थी केली. याप्रश्नी साखर आयुक्तांसोबत बैठक घेत नागाई शुगर्सच्या खात्यांवर निर्बंध घालण्याची प्रक्रिया केली जाईल. आगामी तीन दिवसांत शेतकऱ्यांना पैसे मिळावेत यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन त्यांनी दिले.
भर उन्हात शेतकऱ्यांनी नवापूर चौफुली परिसरात ठाण मांडून कारखान्याने उसाचे पैसे द्यावेत अशी मागणी केली. त्यानंतर तेथे आलेल्या पालकमंत्री पाटील यांनी सांगितले की, शेतकऱ्यांसोबत चर्चा करुन लागलीच आयुक्तांना संबंधित कारखानदारांसोबत चर्चा करण्याचे सूचित करणार आहे. तीन दिवसात पैसे मिळावेत यासाठी प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, आंदोलनामुळे साक्री ते नंदुरबार मार्गावरील वाहतूक तब्बल एक तास ठप्प झाली होती. वाहतूक वळवण्याचे कोणतेही नियोजन नसल्याने प्रवाशांचे हाल झाले. आंदोलनात संयुक्त किसान मोर्चाचे चेतन साळवे, रामकृष्ण चौधरी, सुनंदाबाई पाटील, मणिलाल तुकाराम पाटील, जागृती पाटील, गणेश पाटील, लतिका राजपूत, भाईदास पाटील, सुरेश शिवशंकर पाटील, ओरसिंग पटले यांच्यासह शेतकऱ्यांचा सहभाग होता.