सातारा : अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याने उसाला उच्चतम दर देण्याची परंपरा कायम ठेवली आहे. मागील हंगामात गाळप झालेल्या उसाला प्रति टन १०० रुपयांचा तिसरा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आल्याची माहिती कारखान्याचे मार्गदर्शक संचालक आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी दिली.
गेल्या हंगामासाठी कारखान्याचा प्रति टन २९४० रुपये एफ.आर.पी. दर निघाला होता. त्यानुसार गाळप केलेल्या उसाला कारखान्याने प्रति टन २८०० रुपये पहिला हप्ता आणि प्रति टन ७५ रुपये दुसरा हप्ता वेळेत दिला होता. आता उसाचा तिसरा हप्ता प्रति टन १०० रुपये असून त्यानुसार होणारी एकूण रक्कम ७ कोटी ५ लाख रुपये संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात आली आहे. कारखान्याने एफ. आर. पी. पेक्षा ३५ रुपये प्रति टन एवढी जास्त रक्कम शेतकऱ्यांना दिली असून गाळप झालेल्या उसाचे संपूर्ण पेमेंट अदा केले आहे. आगामी गळीत हंगामातही शेतकऱ्यांना चांगला दर देण्यासाठी कारखाना प्रशासन कटिबद्ध आहे, असे आ. शिवेंद्रराजे यांनी सांगितले. आगामी गळीत हंगाम यशस्वी करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी केले आहे.