कोल्हापूर : गेल्यावर्षीच्या उसापोटी आम्ही प्रति टन ४०० रुपयांची मागणी केली आहे. राज्यातील ८ साखर कारखान्यांनी एफआरपीपेक्षा जादा दर दिला आहे. माळेगाव कारखान्याने एफआरपीपेक्षा ५६४ रुपये दिले आहेत. असा दर इतर कारखान्यांना का परवडत नाही, असा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला. संघटनेच्यावतीने चंदगड तालुक्यात सुरू असलेल्या जनआक्रोश पदयात्रेत ते बोलत होते. राजेंद्र गड्याण्णावर यांनी चंदगडसह गडहिंग्लज, आजरा साखर कारखान्यांवर ही पदयात्रा सुरू ठेवली आहे.
माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले की, जागतिक बाजारामध्ये साखरेचे दर ६५ रुपये किलो आहेत. मात्र भारतीय बाजारामध्ये साखर ३८ रुपये किलो दराने विकली जात आहे. उसापासून तयार केलेल्या उपपदार्थांचे दर वाढले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना चांगला दर देणे सर्व कारखान्यांना देणे परवडणारे आहे. राजेंद्र गड्याण्णावर, प्रा. दीपक पाटील यांनी इकोकेन, ओलम आणि अथर्व साखर कारखान्याने ४०० रुपयांचा दुसरा हप्ता देण्याची मागणी केली. शेतकऱ्यांनी ७ नोव्हेंबरपर्यंत ऊस तोडण्याची गडबड करू नये, असे आवाहन यावेळी करण्यात आले. यावेळी बगिल, रामपूर, माणगाव, शिवणगे, कुदनूर या ठिकाणी सभा घेण्यात आली. विश्वनाथ पाटील, नवनीत पाटील, अजित तुरटे, उत्तम पाटील, सुरेश कुट्रे, गजानन राजगोळकर, संजय पाटील, बाळाराम फडके, गोपाळ गावडे आदी उपस्थित होते.