हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.
कोल्हापूर : चीनीमंडी
शिरोळ तालुक्यातील गुरुदत्त शुगर्स साखर कारखान्यांने राज्यात उच्चांकी एफआरपी दर दिला आहे. ऊस दराचे प्रतिटन ३०६४ रुपये शेतकऱ्यांच्या खात्यांवर जमा करण्यात आले असून, एकूण २३२ कोटी ७१ लाख रुपये शेतकऱ्यांना अदा करण्यात आले आहेत. साखर कारखान्याचे चेअरमन आणि कार्यकारी संचालक माधवराव घाटगे यांनी पत्रकारांना ही माहिती दिली.
साखर कारखान्याचा पंधरावा गाळप हंगाम १४८ दिवस चाललल्याची माहिती घाटगे यांनी दिली. ते म्हणाले, कारखान्याने यंदा ७ लाख ५९ हजार टन ऊस गाळप केले. सरासरी १३.४१ टक्के उतारा मिळाला असून, कारखन्यात १० लाख १८ हजार क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. साखर कारखान्याने कार्यक्षेत्रात एकरी ऊस उत्पादन वाढवण्यासाठी ऊस विकास योजना राबवल्या आहेत. त्यामुळे एकेकाळी एकरी सरासरी २८ टन होणारे उत्पादन आता सरासरी ४३ टनापर्यंत पोहोचल्याचा दावा घाटगे यांनी पत्रकार परिषदेत केला. सध्या देशात साखरेचे अतिरिक्त उत्पादन झाले आहे. याचा परिणाम आंतरराष्ट्रीय बाजारातील साखरेच्या दरांवर झाला आहे. साखरेला उठाव नसल्यामुळे संपूर्ण साखर उद्योग विशेषतः साखर कारखाने संकटात आहेत. तरी देखील गुरुदत्त शुगर्स कारखान्याने शेतकऱ्यांना उच्चांकी एफआरपी दिल्याची माहिती घाटगे यांनी यावेळी दिली.
शिरोळ तालुक्यात क्षारपड जमिनीचा प्रश्न मोठा आहे. या जमिनींचा पोत सुधारण्यासाठी गुरुदत्त शुगर्स आणि राज्य सरकार यांनी संयुक्तपणे क्षारमुक्त करण्याचा प्रयत्न सुरू केल्याची माहिती घाटगे यांनी दिली. सरकारने क्षारपड मुक्तीसाठी हेक्टरी ६० तर कारखान्याने हेक्टरी दहा हजार रुपयांचे अनुदान दिले आहे, असे घाटगे यांनी सांगितले. या वेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक राहुल घाटगे, धीरज घाटगे, संचालक सखाराम कदम, जे. आर. पाटील, धोंडिराम नागणे, बबन चौगुले, संजय गायकवाड आदी उपस्थित होते.