सोलापूर : युटोपियन कारखान्याने गेल्या हंगामात एक कोटी ४४ लाख लिटरचे इथेनॉल उत्पादन केले आहे. साधारणपणे तितकेच उत्पादन यावर्षीही अपेक्षित आहे. गळीत हंगामासाठी सर्व यंत्रणा सज्ज असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन उमेश परिचारक यांनी दिली. युटोपियन शुगर्स लि. कारखान्याच्या दहाव्या गळीत हंगामाचा बॉयलर पूजन व अग्निप्रदीपन समारंभ मंगळवारी पार पडला. यावेळी उमेश परिचारक बोलत होते.
चेअरमन परिचारक म्हणाले की, युटोपियन शुगर्सने सध्या दुष्काळसदृश स्थिती असतानाही चांगली तयारी केली आहे. कारखाना चालू गळीत हंगाम ऊस उत्पादक यांच्या विश्वासावर व ऊस उत्पादकांना वेळेत, चांगला दर देत असल्यामुळे यशस्वी पार पडेल. गळीत हंगाम २०२३-२४ हा आपल्या कारखान्याचा दशकपूर्ती गळीत हंगाम आहे. मागील नऊ वर्षांत केवळ ऊस उत्पादकांच्या विश्वासावर आपल्या नावलौकिक मिळवला आहे. ही विश्वासार्हता कायम ठेवली जाईल. चेअरमन उमेश परिचारक व मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन परिचारक यांच्या हस्ते बॉयलर पूजन व अग्निप्रदीपन करण्यात आले. संगणक विभागप्रमुख अभिजित यादव व त्यांच्या पत्नी जयश्री यांच्या हस्ते पूजा करण्यात आली. नागनाथ मोहिते व अधिकारी, कर्मचारी आदी उपस्थित होते. लक्ष्मण पांढरे यांनी आभार मानले.