इस्लामाबाद : बेकायदेशीर कारवायांना आळा घालण्यासाठी अधिकारी देशभरात साठेबाजी करणाऱ्यांवर मोठी कारवाई करत आहेत आणि आतापर्यंत ६,९९४ मेट्रिक टन साखर जप्त करण्यात आली आहे असे वृत्त एआरवाय न्यूजने दिले आहे. बुडत्या अर्थव्यवस्थेचे पुनरुज्जीवन करण्यासाठी पाकिस्तानच्या कार्यवाहक सरकारने साठेबाजांवर मोठी कारवाई केली आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार, देशात एकूण ५,११२ मेट्रिक टन खते, २,३६६ मेट्रिक टन आटा आणि ६,९९४ मेट्रिक टन साखर जप्त करण्यात आली आहे.
पाकिस्तानच्या पंजाब सरकारने अधिकृत दरांवर साखर उपलब्ध करून देण्यासाठी संपूर्ण प्रांतात साखरेच्या साठेबाजांवर कारवाई गतीमान केली आहे. जिल्हा प्रशासनाने पोलिस आणि अन्न विभागाच्या पथकांच्या सरगोधा, साहीवाल, फैसलाबाद आणि रहीम यार खान येथे छापे टाकले. कारवाईदरम्यान सरगोधा आणि फैसलाबादमध्ये दोन साखर कारखाने सील करण्यात आले.
अधिकाऱ्यांनी माध्यमांना सांगितले की, विविध शहरांमध्ये साखरेचा साठा मोठ्या प्रमाणावर जप्त करण्यात आला आहे. जप्त साखर नियंत्रीत दरात बाजारात विक्री केली जाईल. विभागाचे मुख्य सचिव म्हणाले की, ग्राहकांची लूट करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. साठेबाजांवरही कारवाई सुरूच राहील. ते म्हणाले की, अधिकृतरित्या निश्चित केलेल्या ८९.७५ रुपये किलो या दरापेक्षा जास्त किमतीने साखर विक्रीची परवानगी दिली जाणार नाही.