सोलापूर : जिल्ह्यात यंदा ४१ पैकी ३७ साखर कारखान्यांनी ऊस गळीत हंगाम सुरू करण्याची तयारी केली आहे. या कारखान्यांनी गाळपासाठी अर्ज केले आहेत. दुष्काळी स्थितीमुळे यंदा ऊस मिळवण्यासाठी साखर कारखान्यांना कसरत करावी लागणार आहे. जिल्ह्यात दोन लाख ४० हजार हेक्टर क्षेत्रात ऊस लागवड करण्यात आली आहे. गेल्यावर्षी दोन लाख ३० हजार हेक्टर क्षेत्रात ऊस लागवड झाली होती. यंदा लागवड क्षेत्र दहा हजार हेक्टरने जास्त आहे. मात्र, पावसाने दडी मारल्याने ऊस उत्पादन ३० हजार हेक्टरने घटेल अशी शक्यता आहे. त्याचा परिणाम साखरेच्या उताऱ्यावर होण्याची शक्यता आहे.
पिंपळनेर (ता. माढा) येथील विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याने यंदा २५ लाख मे. टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. अकलूजच्या सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखान्याचे १० लाख मे. टन ऊस गाळप उद्दिष्ट आहे. सदाशिवनगर शंकर सहकारी साखर कारखाना, श्रीपूरचा सुधाकरपंत परिचारक सहकारी साखर कारखाना, सोलापूरचा सिध्देश्वर, उत्तर व दक्षिण सोलापूर तालुक्यातील सिध्दनाथ, लोकमंगल, जयहिंद, गोकुळ, मंगळवेढ्यातील संत दामाजी, युटोपियन, अक्कलकोट तालुक्यातील मातोश्री लक्ष्मी, माढा तालुक्यातील म्हैसगावचा विठ्ठल शुगर, करमाळा तालुक्यातील आदिनाथ, कमलादेवी आदींसह सर्व कारखाने गाळपासाठी सज्ज झाले आहेत.