कोल्हापूर : देशासह राज्यातील साखर कारखानदारी टिकायची असेल, ऊस उत्पादकांना योग्य दर द्यायचा असेल, तर केंद्र सरकारने साखरेला प्रती किलो ४० रुपये हमीभाव व इथेनॉलचा दर प्रती लिटर ७० रुपये करावा, अशी मागणी माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी केली. कुडित्रे येथील कुंभी-कासारी साखर कारखान्याचा बॉयलर अग्निप्रदीपन कार्यक्रमात ते बोलत होते. संचालक डॉ. बी. बी. पाटील व त्यांच्या पत्नी मंगल पाटील यांच्या हस्ते बॉयलर अग्निप्रदीपन झाले.
नरके म्हणाले, हंगाम २०२२-२३ मधील गाळप झालेल्या उसाची एफआरपी रु. ३१५० प्रमाणे संपूर्ण रक्कम रु.१८९ कोटी १२ हजार अदा केली आहे. सहवीज प्रकल्प पूर्णक्षमतेने सुरू असून चालू हंगामात इथेनॉल प्रकल्प कार्यान्वित होत आहे. हंगाम २०२३-२४ करिता ११,२३७ हेक्टर उसाची नोंद आहे. यंदाच्या हंगामात ७ लाख मे. टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट आहे. पावसाने प्रदीर्घ ओढ दिल्याने उत्पादनावर परिणाम होणार आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी संपूर्ण पिकविलेला ऊस गळितास पाठवून सहकार्य करावे, असे आवाहन चेअरमन नरके यांनी केले. यावेळी कारखान्याचे व्हा. चेअरमन विश्वास पाटील, सर्व संचालक, कार्यकारी संचालक धीरजकुमार माने, सचिव प्रशांत पाटील, कामगार प्रतिनिधी, ऊस उत्पादक सभासद उपस्थित होते.