कोल्हापूर : गेल्यावर्षी बाजारात साखरेचा दर प्रति क्विंटल ३२०० रुपये होता. तेंव्हा साखर कारखान्यांनी तीन हजार रुपये दर दिला. आता साखरेचा दर ३८५० रुपये क्विंटल झाला आहे. इथेनॉलचे एक टक्के वाढीव धरले तर १६१ रुपये प्रतिटन वाढतात. हे साधे गणित धरूनच गेल्या वर्षी तुटलेल्या उसाला ४०० रुपयांची आम्ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मागणी केली आहे, असे माजी खासदार राजू शेट्टी यांनी सांगितले.
‘जादा दर कसा बसणार? तुमचे सी.ए. पाठवून देवून हिशोब तपासा’, या मंत्री हसन मुश्रीफ यांच्या प्रश्नाला उत्तर देताना, कारखान्यांची विवरण पत्रे आमच्याकडे द्या; ऊस दर कसा बसतो आम्ही सांगतो, असे प्रतिआव्हान शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिले.
चारशेचा दुसरा हप्ता दिल्याशिवाय उसाचे कांडे तोडू देणार नाही, असा सज्जड इशारा शेट्टी यांनी साखर कारखानदारांना दिला. पदयात्रा बिद्री येथील कारखान्यावर पोहोचली. यावेळी ते बोलत होते. यावेळी बिद्रीचे अध्यक्ष के. पी. पाटील यांना मागणीचे निवेदन देण्यात आले. यावेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक के. एस. चौगले, मनोज फराकटे, मधुकर देसाई उपस्थित होते.