सोलापूर : दामाजी कारखान्यातर्फे दिपावली सणासाठी शेतकऱ्यांना प्रती टन ५१ रुपये जादा बिल ५ नोव्हेंबरपासून खात्यावर जमा केले जाणार आहेत. कर्मचाऱ्यांना १० टक्के बोनस दिला जाणार आहे, अशी माहिती चेअरमन शिवानंद पाटील यांनी दिली. संत दामाजी साखर कारखान्याचा ३१ वा गळीत हंगाम प्रारंभ विजयादशमीच्या मुहूर्तावर कारखान्याचे संस्थापक संचालक व माजी चेअरमन ॲड. नंदकुमार पवार, माजी व्हा. चेअरमन रामचंद्र वाकडे, मनोहर कलुबर्मे, भुजंगराव पाटील, प्रकाश गायकवाड, दिलीप मर्दा, आबासो बेदरे, मंगल दुधाळ, मंदाकिनी बिराजदार यांच्या हस्ते पार पडला.
यावेळी संचालक राजेंद्र पाटील व त्यांच्या पत्नी मंजुषा यांच्या हस्ते सत्यनारायण महापूजा करण्यात आली. शिवानंद पाटील म्हणाले की, कारखान्याने मागील हंगामाची एफआरपी २२९६ रुपये असताना २३०० रुपयांप्रमाणे शेतकऱ्यांना सर्व बिल दिले आहे. कारखान्याची आर्थिक घडी विस्कटली असताना पारदर्शक व काटकसरीने कारभार करून जुनी व चालू देणी भागवली आहेत. चालू हंगामामध्ये कारखान्याने ४ लाख मेट्रिक टन गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे.
प्रा. शिवाजीराव काळुगे यांनी संचालक मंडळाने अत्यंत काटकसरीने कारखाना चालविल्याचे सांगितले. कार्यकारी संचालक रमेश जायभाय यांनी प्रास्तविक केले. व्हाईस चेअरमन तानाजी खरात, संचालक मुरलीधर दत्तू, गौरीशंकर बुरकूल, गोपाळ भगरे, राजेंद्र पाटील, भारत बेदरे, दयानंद सोनगे, औदुंबर वाडदेकर, रेवणसिद्ध लिगाडे, भिवा दोलतडे, बसवराज पाटील, अशोक उन्हाळे, लतीफ तांबोळी, गौडाप्पा बिराजदार, दिगंबर भाकरे, महादेव लुगडे, तानाजी कांबळे आदी उपस्थित होते.