पुणे : ऊसतोड कामगारांच्या कल्याणासाठी स्व. गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाची स्थापना करण्यात आली आहे. ऊसतोड कामगारांच्या मागण्यांबाबत सकारात्मक मार्ग काढून न्याय मिळवून देण्याच्या प्रयत्न करण्यात येईल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. सोमेश्वरनगर येथे सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या ६२ व्या गळीत हंगाम प्रारंभप्रंसगी पवार बोलत होते.
उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की, सोमेश्वर कारखान्याची वाटचाल योग्य दिशेने सुरू आहे. २०२२-२३ या गाळप हंगामाकरिता राज्यात सर्वाधिक प्रती टन ३३५० रुपये ऊस दर जाहीर केला आहे. आगामी काळातही कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना योग्य भाव मिळावा यासाठी संचालक मंडळाने प्रयत्न करावेत. यंदाचे पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी असल्यामुळे उसाच्या क्षेत्रात व साखर उत्पादनात होणारी घट याचाही विचार करावा. साखर कारखान्यांनी प्रदूषणविषयक नियमांचे पालन करावे, असे त्यांनी सांगितले.
उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते मोळीपूजन करून मोळी गव्हाणीमध्ये सोडून गळीत हंगामाचा प्रारंभ करण्यात आला. आमदार दत्तात्रय भरणे, संजय जगताप, पुणे जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्रा. दिगंबर दुर्गाडे, संचालक संभाजी होळकर, दत्तात्रय येळे, सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष ॲड. पुरुषोत्तम जगताप, उपाध्यक्ष प्रणिता खोमणे, बारामती सहकारी बँकचे अध्यक्ष सचिन सातव, बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुनील पवार, बारामती तालुका सहकारी दूध संघाचे अध्यक्ष पोपटराव गावडे, नीरा बाजार समितीचे सभापती शरद जगताप, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विश्वास देवकाते आदी उपस्थित होते. कार्यकारी संचालक राजेंद्र यादव यांनी आभार मानले.