कोल्हापूर : यंदा जाणाऱ्या उसास चांगला भाव मिळायचा असेल तर दर ठरल्याशिवाय ऊस तोडी घेऊ नका. जादा दराच्या मागणीसाठी १ नोव्हेंबरच्या शेतकरी एल्गार रॅलीत व ९ नोव्हेंबरच्या एल्गार सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन ‘आंदोलन अंकुश’चे प्रमुख धनाजी चुडमुंगे यांनी केले. कारखानदारांकडून उसाची तोड स्लिप येईल. त्यावेळी गेल्या हंगामातील जादाचे पैसे शेतकऱ्यांनी मागावेत. मागील गळीत हंगामाच्या ऊस दरापोटी पाचशे रुपये मिळणे अपेक्षित आहे असे ते म्हणाले. अर्जुनवाड (ता. शिरोळ) येथे ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते.
चुडमुंगे म्हणाले की, गेल्या पन्नास वर्षांत पहिल्यांदाच शेतकऱ्याच्या बाजूने परिस्थिती आहे. या पोषक परिस्थितीचा फायदा उठवून आपल्याला एफआरपीवर पाचशे रुपये या कारखानदारांकडून घ्यायचे आहेत. त्यासाठी ‘आंदोलन अंकुश’च्या मिशन ३५०० ला साथ द्यावी. यावेळी ‘आंदोलन अंकुश’ला शेतकरी वजन काटा उभारण्यासाठी अर्जुनवाड गावाने केलेल्या ८०,००० रुपयांच्या मदतीबद्दल रघुनाथ पाटील यांनी शेतकऱ्यांचे आभार मानले. आंदोलन अंकुशचे अनिल सुतार, संजय चौगुले, वसंत नरदे, बाबूराव कदम, तानाजी नरदे, सखाराम झांबरे, सरपंच विकास पाटील, चंद्रकांत पाटील, संदीप धनवडे उपस्थित होते.