सोलापूर : भीमा सहकारी साखर कारखान्याच्यावतीने चालू गळीत हंगामात ऊसाला प्रती टन २,४०० रुपये पहिली उचल देण्यात येणार आहे, अशी माहिती कारखान्याचे मार्गदर्शक संचालक, खासदार धनंजय महाडिक यांनी दिली. टाकळी सिकंदर (ता. मोहोळ) येथील कारखान्याच्या ४४ व्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन सोहळा व मोळी पूजन समारंभात ते बोलत होते.
खासदार धनंजय महाडिक यांच्यासह कारखान्याचे पाच ज्येष्ठ सभासद सिद्धेश्वर पवार, सुखदेव चवरे, बजरंग चव्हाण, तानाजी हांडे व औदुंबर चव्हाण यांच्या हस्ते बॉयलर अग्निप्रदीपन सोहळा व मोळी पूजन करण्यात आले. यावेळी खासदार महाडिक यांनी सांगितले की, उजनीच्या पाण्याचे पहिले आवर्तन डिसेंबर व मार्चमध्ये सोडावे अशी विनंती कालवा नियोजन समितीच्या बैठकीत करणार आहे.
कारखान्याचे अध्यक्ष विश्वराज महाडिक यांनी दररोज जास्तीत जास्त साडेपाच हजार मेट्रिक टन उसाचे गाळप करण्यात येणार असल्याचे सांगितले. ते म्हणाले की, कामगारांची दिवाळी गोड व्हावी म्हणून ८.३३ टक्के बोनस व १५ किलो साखर मोफत दिली जाईल. सिव्हिल विभागातील कामगारांना शंभर रुपये रोज वाढ करण्यात येत आहे. कार्यकारी संचालक सूर्यकांत शिंदे, सुनील चव्हाण, अंकुश अवताडे, वीरसेन देशमुख, दीपक पुजारी, विशाल पवार, विकास पाटील, माणिक बाबर, महादेव देठे, छगन पवार, पांडुरंग ताटे, भीमराव वसेकर उपस्थित होते.