नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासूनच कांद्याच्या राष्ट्रीय किरकोळ दरात तब्बल ५७ टक्क्यांनी वाढ झाली आहे. कांद्याचा दर ४७ रुपये किलो झाला आहे. तर नवी मुंबईतील कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याने पन्नाशी गाठली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने आपल्याकडील बफर स्टॉक खुला केला आहे. दरवाढ रोखण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत.
नवी मुंबईत चांगल्या कांद्याला किलो ५५ रुपयांचा दर मिळाला आहे. कांद्याचे कमी झालेले उत्पादन पाहता दर आता वाढतच राहणार आहेत असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. घाऊक बाजारात कांद्याच्या १०० ते १२५ गाड्या येतात. मात्र आता निम्म्याच गाड्या येत आहेत असे व्यापाऱ्यांनी सांगितले. घाऊक बाजारात केवळ २० टक्के चांगला कांदा येत आहे.
दरम्यान, ही दरवाढ रोण्यासाठी सरकारने नॅशनल ॲग्रिकल्चरल को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया (नाफेड) आणि नॅशनल कन्झुमर को-ऑपरेटिव्ह फेडरेशन ऑफ इंडिया या दोन सहकारी संस्थांच्या माध्यमातून दर रोखण्यासाठी उपाययोजना सुरू केल्या आहेत. जेथे कांद्याची दरवाढ झाली आहे अशा राज्यांत बफर स्टॉकमधील कांदा २५ रुपये किलो दराने विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात येत आहे.
केंद्र सरकारने कांद्याचा बफर स्टॉक दुप्पट केला आहे. त्यामुळे आगामी काळात कांद्याच्या वाढत्या किमतींना आळा बसेल अशी शक्यता आहे. ग्राहक व्यवहार मंत्रालयाने नाफेड आणि एनसीसीएफमार्फत पाच लाख टनांचा बफर स्टॉक ठेवला आहे. अतिरिक्त दोन लाख टन कांदा खरेदी केला जाणार आहे असे सूत्रांनी सांगितले.