सातारा : येथील किसन वीर सातारा सहकारी साखर कारखाना गळीत हंगामासाठी सज्ज झाला आहे. सहकार मंत्री दिलीप वळसे- पाटील यांच्या हस्ते, विधान परिषदेचे माजी सभापती आमदार रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली कारखान्याचा २०२३-२४ चा ५३ वा गळीत हंगामाचा प्रारंभ रविवारी (दि. २९) होणार आहे.
वाई खंडाळा- महाबळेश्वर तालुक्याचे आमदार, किसन वीर साखर कारखान्याचे चेअरमन मकरंद आबा पाटील, सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन नितीनकाका पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रारंभ होणार आहे. कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रमोद शिंदे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे ही माहिती दिली. २९ ऑक्टोबर रोजी किसन वीर कारखान्याचे चेअरमन, आमदार मकरंद आबा पाटील यांचा वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिनाचे औचित्य साधूनच कारखान्याचा गळीत हंगाम प्रारंभ करण्यात येणार आहे. कार्यक्षेत्रातील सर्व सभासद बंधू-भगिनी, हितचिंतक, कंत्राटदार, वाहन मालक आणि कार्यकर्त्यानी उपस्थित रहावे, असे आवाहन व्हाईस चेअरमन प्रमोद शिंदे, कार्यकारी संचालक जितेंद्र रणवरे व संचालक मंडळाने केले आहे.