जालना : अंकुशनगर, ता. अंबड येथील कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखान्याकडे यंदाच्या गळीत हंगामासाठी कारखाना कार्यक्षेत्रात ३५ हजार ६८६.८५ हेक्टर उसाची नोंद झाली आहे. एकूण २१.४१ लाख टन ऊस गाळपासाठी उपलब्ध होईल. यापैकी कारखान्याचे युनिट नं. एक अंकुशनगरकडे १३.५० लाख टन व युनिट नं. २ (सागर) तीर्थपुरीकडे ४.५० लाख असे १८ लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट आहे, असे प्रतिपादन माजी आरोग्यमंत्री आमदार राजेश टोपे यांनी केले. कारखान्याच्या युनिट नं.१ अंकुशनगर, युनिट नं. २ (सागर) तीर्थपुरी येथे ऊस गव्हाण पूजन समारंभ गुरुवारी पार पडला. यावेळी माजी मंत्री टोपे बोलत होते.
यावर्षी शेतकरी, तोडणी वाहतूक कंत्राटदार व कारखान्याच्या कर्मचाऱ्यांच्या हस्ते गव्हाण पूजन करण्यात आले. टोपे म्हणाले, की गेल्यावर्षी युनिट एक अंकुशनगरकडे ७,६४,००० टन व युनिट दोन (सागर) तीर्थपुरीकडे ५,१४,७२९ टन ऊस गाळप झाले. उसाला २७०० रुपये अंतीम दर निश्चित केला आहे. यापैकी २६०० रुपये अदा केले असून उर्वरित १०० रुपये १ नोव्हेंबरपासून अदा करण्यात येतील.
यंदाच्या हंगामामध्ये गळितास येणाऱ्या उसास मराठवाड्यातील कारखान्यांचे बरोबरीने अधिकचा ऊस भाव देण्याचा प्रयत्न केला जाईल. एक नोव्हेंबरपासून ऊस गाळपास सुरुवात करण्यात येणार आहे असे टोपे यांनी सांगितले. यावेळी उपाध्यक्ष उत्तमराव पवार, व्यवस्थापकीय संचालक बी. टी. पावसे, कार्यकारी संचालक दिलीप पाटील आदी उपस्थित होते.