ऊस पिकासाठी ‘ऑक्सफर्ड’च्या मदतीने ‘व्हीएसआय’मध्ये ‘एआय’ अभ्यासक्रम सुरु

पुणे : मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिटयूटमध्ये इंग्लडच्या ऑक्सफर्ड वि‌द्यापीठाने ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स फॉर ॲग्रिकल्चरल टेक्नॉलॉजी अँड क्लायमेट चेंज हा अभ्यासक्रम सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या सहकार्याने राबविण्यात येत असलेल्या या अभ्यासक्रमाला ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते २६ ऑक्टोबरपासून सुरुवात झाली आहे.

‘शुगरटूडे’मध्ये प्रकाशित वृत्तानुसार, ऊस उत्पादनातील आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराबाबत ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटबरोबर काम करणार आहे. ट्रस्टच्या कामकाजाची माहिती घेवून ऑक्सफर्ड विद्यापीठाने ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टसोबत सामंजस्य करार केला आहे. या कराराअंतर्गत जगातील दुसरे सेंटर ऑफ एक्सलेन्स फार्म व्हाईब्ज याची निर्मिती ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट येथे करण्याची घोषणा मायकोसॉफ्टचे कार्यकारी संचालक डॉ. रणवीर चंद्रा यांनी केली होती. आता सेंटर ऑफ एक्सलन्स फार्म व्हाईब्जअंतर्गत ट्रस्टच्या प्रक्षेत्रावर आर्टिफिशल इंटेलिजिन्स, मशिन लर्निंग, आयओटी, एआर, व्हीआर यांसारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा कृषी क्षेत्रात वापर करता येईल. याचे प्रात्यक्षिक प्रकल्प उभारण्याचे काम गेट्स फांउडेशन, मायकोसॉफ्ट, ऑक्सफर्ड यांच्या संयुक्त विद्यमाने होत आहे.

तंत्रज्ञानाचा वापर करून जमिनीतले सेन्सर, ड्रोन रोबॉट, सेटेलाईटद्वारे शेतात खत, पाणी व्यवस्थापन, किड व रोग व्यवस्थापन, उत्पादनाची गुणवता वाढवणे, काढणी पश्चात तंत्रज्ञान, उत्पादनाचा अंदाज, हवामान बदलानुसार पिक पध्दतीचे नियोजन, बाजारभावाचा अंदाज, जमिनीची उत्पादकता वाढवणे, मातीची गुणवत्ता वाढवणे, रासायनिक खतांचा कमी वापर करणे यासाठी नियोजन केले जाणार आहे. ऊस पिकासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स व मशिन लर्निंगचा वापर करून मातीच्या गुणवत्तेनुसार खत व पाणी व्यवस्थापन करण्यासाठी अद्ययावत सेन्सर आणि उपग्रहाचा वापर करून ऊस उत्पादकाचा एकरी उत्पादनाच्या टनेजचा अंदाज बांधता येणार आहे. साखर उतारा, तोडणीसाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here