सोलापूर : भीमा सहकारी साखर कारखान्याने दर जाहीर केल्याशिवाय परिसरातील इतर कारखाने कधीच ऊस दराची कोंडी फोडत नव्हते, यंदाही खासदार धनंजय महाडिक यांनी २४०० रुपये प्रति मे. टन काटा पेमेंट पहिली उचल देणार असल्याचे जाहीर केले. यंदा दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर उसाची कमतरता आणि साखरेचा जागतिक बाजारपेठेतील दर वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उसाला यापेक्षा दर अधिक दिला पाहिजे, असा विचार करून चेअरमन विश्वराज धनंजय महाडिक यांनी यंदाच्या गळीत हंगामात गाळपास येणाऱ्या उसाला १२४ रुपये प्रति टन वाढ केली. त्यामुळे आता भीमा सहकारी साखर कारखान्यातर्फे प्रति टन २५२५ रुपये काटा पेमेंट पहिली उचल जाहीर केली आहे.
भीमा सहकारी साखर कारखाना येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना चेअरमन महाडिक म्हणाले की, गेल्या दोन ते तीन वर्षापासून भीमाचा शेतकरी अडचणीत आला आहे. त्यांना मदतीचा दिला पाहिजे, असा विचार करण्यात आला. याबाबत खासदार धनंजय महाडिक यांच्याशी चर्चा झाल्यानंतर कारखान्याला कोणत्याही प्रकारचा उपपदार्थ निर्मितीचा प्रकल्प नसताना २५२५ रुपये काटा पेमेंटची पहिली उचल देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी कार्यकारी संचालक सूर्यकांत शिंदे, कार्यालयीन अधीक्षक भाऊसाहेब जगताप, संचालक तात्या नागटिळक, बाळासाहेब गवळी, संभाजी कोकाटे, चंद्रसेन जाधव, भाजपा तालुकाध्यक्ष सुनील चव्हाण, शेतकरी संघटनेचे छगन पवार, राजाराम बाबर यांच्यासह शेतकऱ्यांनी चेअरमन विश्वराज महाडिक यांचा मानाचा फेटा, शाल व पुष्पहार देऊन सत्कार केला.